औरंगाबादः


शहरातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता कोव्हीडग्रस्तांसाठी ऑक्सीजनची व्यवस्था करण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. या अंतर्गत शहरातील पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी)चे रुपांतर डीसीएचसीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या डीसीएचसीमधील १२०० बेडसाठी ऑक्सीजनची व्यवस्था केली जाणार आहे.
कोरोना रुग्णांवर घाटी, जिल्हा रुग्णालय, महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंंटरसह विविध कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात उपचार केले जातात. बहुतांश रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास जाणवत असल्याने ऑक्सीजनची गरज लागत आहे. महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील १२८ बेडसाठी ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र इतर कोविड केअर सेंटरसाठी ही व्यवस्था अद्याप झालेली नाही. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी आढावा बैठकीत महापालिकेला कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सीजनची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनपाने त्या दिशेने तयारी सुरु केली आहे.


मनपाचे कोविड केअर सेंटर असलेले एमजीएम स्पोर्टस कॉम्प्लेक्स, पदमपूरा, किलेअर्क, एमआयटी, सिपेट या पाच कोविड केअर सेंटरचे रुपांतर डीएसीएचसीमध्ये केले जाणार असून या ठिकाणी उपलब्ध असलेल्या बेड्सला ऑक्सीजनची व्यवस्था केली जाणार आहे. त्याकरिता प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र ऑक्सीजनची लाईन टाकावी लागणार असून मनपाने तयारी सुरु केली आहे. या पाच कोविड केअर सेंटरमधील सुमारे १२०० बेड ऑक्सीजनचे तयार केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.

पाचही डीसीएच खासगी रुग्णालयाशी होणार सलग्न
महापालिकेचे पाच डीसीएचसी सेंटर लवकरच खासगी रुग्णालयाशी संलग्न केले जाणार आहे. डीसीएचसीमधील कोरोना रुग्ण गंभीर आजारी झाल्यास किंवा व्हेंटीलेटरसह व तातडीने उपचाराची आवश्यकता असल्यास या रुग्णांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले जाईल. मात्र याचा खर्च रुग्णांना करावा लागणार आहे.