औरंगाबाद / प्रतिनिधी,

शासनाने गठीत केलेल्या समितीने पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचे दर घटवले आहेत. त्यानुसार आता थेट प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास 1900 ऐवजी 1200 रूपये आकारले जातील. तर रूग्णालयात येऊन प्रशोगशाळेने रूग्णाचा स्वॅब नेल्यास 2200 ऐवजी 1600 रूपये शुल्क आकारले जाईल. तसेच खासगी प्रयोगशाळांना यापेक्षा अधिकचे दर आकारता येणार नाहीत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात आरटीपीसीआर चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांकडून 4500 रूपये शुल्क आकारले जात होते. विशेष म्हणजे, हे दर शासनानेच ठरवून दिले होते. मात्र या वाढीव दरामुळे ऐन आर्थिक संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत होती. त्यामुळे हे दर कमी करण्याची मागणी काही संस्थांनी शासन दरबारी केली होती. त्यानुसार मध्यंतरी शासनाने भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत केली. या समितीने चाचणीचे दर 3200 रूपयांवर आणले होते. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी पुन्हा दर कमी केले. त्यात रूग्णाने स्वतः प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास 1900 रूपये, रूग्णालयातून स्वॅब नेल्यास 2200 रूपये, तसेच रूग्णाच्या घरी येऊन स्वॅब नेल्यास 2500 रूपये असे या तिनही प्रकारांत वेगवेगळे दर आकारण्यात आले. दरम्यान, राज्यात आयसीएमआर व एनएबीएलने कोरोना चाचणीसाठी मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांची संख्या देखील वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने पुन्हा एकदा दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता 1200, 1600 आणि 2000 असे सुधारित दर आरटीपीसीआर चाचणीसाठी शासनाने निश्‍चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हे आदेश 7 सप्टेंबर रोजी जारी केले आहे.

आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित दर
- रूग्णाने प्रयोगशाळेने जाऊन स्वॅब दिल्यास - 1200 रूपये.
- रूग्णालयातून प्रयोगशाळेने स्वॅब नेल्यास - 1600 रूपये
- प्रयोगशाळेने रूग्णाच्या घरी जाऊन स्वॅब नेल्यास - 2000 रूपये.