औरंगाबाद  : कोरोना लसींचा योग्य पुरवठा होत नसल्याने महापालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेचा बट्ट्याबोळ झाला आहे. रोजच्या मागणीच्या प्रमाणात खूपच अत्यल्प लस उपलब्ध होत असून त्यातही पालिकेचे योग्य नियोजन नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील चार-पाच दिवसांपासून 45 वर्षावरील नागरिक दुसर्‍या डोससाठी पहाटेपासूनच केंद्रावर रांगा लावत आहेत. मात्र केवळ शंभर ते दीडशे लसी केंद्रांना मिळत असल्याने त्या काही तासांतच संपत असून तीन वेळा चकरा मारूनही काही नागरिकांना अद्याप लस मिळालेली नाही. गुरुवारी दि.6 तर सकाळीच केंद्रांवरील लस संपल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पालिकेच्या कर्मचार्‍यांशीच वाद घातल्याचे दिसून आले. दरम्यान कोविशिल्ड लसींचा पालिकेकडील साठा संपल्याने 45 वर्षांवरील नागरिकांना पुन्हा दोन दिवस थांबावे लागणार आहे. सोमवारी किंवा मंगळवारी लस मिळण्याची शक्यता आहे, असे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून लसीकरणाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रत्येक वॉर्डात याप्रमाणे 115 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली. अशा प्रकारे लसीकरणाची तयारी करणारी औरंगाबाद पालिका ही राज्यातील एकमेव असल्याचा दावा आयुक्‍त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केला होता. पालिकेने 5 एप्रिलपासून 45 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी जम्बो मोहीम हाती घेतली. सुरवातीला कोविशिल्ड लसींचा मुबलक मिळाल्याने लसीकरणाने गती घेतली. मात्र आता मागील दोन आठवड्यापासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना राज्य शासनातर्फे तर 45 वर्षावरील नागरिकांना केंद्र शासनातर्फे मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे पालिकेचा एकच गोंधळ उडालेला आहे. एका आठवड्यासाठी एक लाख लसींची पालिकेला गरज आहे, मात्र केवळ 10 ते 15 हजार तर कधी पाच हजार, सात हजार याप्रमाणे लसी मिळत आहेत. विशेष म्हणजे, एकदा लसींचा साठा संपल्यानंतर पुढील लस केव्हा मिळेल याची शाश्वती देखील नाही. त्यामुळे शहरात लसीकरण मोहिमेचा बट्ट्याबोळ झाला आहे. 

आता सोमवारी मिळेल लस
केंद्र सरकारकडून 45 वर्षावरील व्यक्तींसाठी आलेल्या लसींचा साठा गुरुवारी संपला. त्यामुळे आता पुढील साठा केव्हा मिळेल हे पालिकेला शासनाने कळवलेले नाही. यामुळे आता सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, 
असे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.

केंद्रांवर रांगा, गोंधळच गोंधळ     
बुधवारी दिवसभरात प्राप्‍त लसींपैकी 7,705 लसी संपल्या. त्यामुळे दुसर्‍या दिवसासाठी केवळ 1800 लसी शिल्लक राहिल्या होत्या. बुधवारपासून लसीकरण सुरू झाल्याचे कळताच गुरुवारी पहाटेपासूनच अनेक केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांनी रांगा लावल्या. सकाळी 10 वाजेपर्यंत रांगेतील नागरिकांची संख्या 400 ते 500 पर्यंत गेली. मात्र केंद्रावर अधिकारी कर्मचारी दाखल होताच त्यांनी फक्त 100 लस उपलब्ध आहेत. तेवढ्याच नागरिकांना लस मिळेल, असे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. काही आरोग्य कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद झाला. या वादात लसीकरण सुरू असताना दुपारनंतर लसी संपल्याने अनेकजण संताप व्यक्‍त करत माघारी फिरले.

कोविन अ‍ॅप नोंदणीत संभ्रम
केंद्र व राज्य सरकारने यापुढे लस घेतना (पहिला डोस) कोविन अ‍ॅपवर नोंदणी करूनच घेणे बंधनकारक असल्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र कोविन अ‍ॅपवर 28 मेपर्यंत नोंदणी फुल्ल झाली आहे. या अ‍ॅपवर कोणत्या केंद्रावर शहरात लस मिळेल, याची नावे देखील येत नाही. त्यामुळे अनेकजण संभ्रमात पडले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचा तर पूर्णतः गोंधळ उडालेला आहे. तर दुसरीकडे अडचणींमुळे नोंदणी करताना रात्र होण्याचीही वाट पाहवी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

तरुणांचा प्रतिसाद, अनेकजण वेटींगवर
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला राज्यात 1 मे पासून प्रारंभ झाला आहे. मात्र यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी बंधनकारक केली आहे. नोंदणी केलेल्या शंभर नागरिकांनाच प्रत्येक केंद्रांवर लस दिली जात आहे. सुरुवातीला शहरातील सादातनगर, कैसर कॉलनी, मुकुंदवाडी या तीन आरोग्य केंद्रात 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले. आता साडेपाच हजार कोव्हॅक्सीन लस प्राप्‍त झाल्याने गुरुवारपासून क्रांतीचौक, चेतनानगर, लायन्स आय हॉस्पिटल या तीन केंद्रावर लस दिली जात आहे. ही लस घेण्यासाठी तरुणांची केंद्रांवर गर्दी होत आहे. आजवर सहा दिवसात शहरात दिड हजार तरुणांनी लस घेतली आहे. मात्र केवळ तीनच केंद्र आणि रोजची केवळ तीनशेच जणांना लस दिली जात असल्याने अनेकजण वेटींगवर आहेत.

केंद्र बदलल्याने नागरिकांची पायपीट
चार दिवसांच्या खंडानंतर पालिकेला बुधवारी दि.5 सकाळी 45 वर्षावरील व्यक्तींसाठी कोविशिल्डच्या 9 हजार 550 लसी प्राप्‍त झाल्या. लसच कमी मिळाल्याने पालिकेने अचानक लसीकरण केंद्रांची संख्या 115 वरून 50 केली. मिळालेल्या लसी फक्त दुसर्‍या डोससाठी राखीव ठेवल्या. त्यामुळे पहिला डोस घेण्यासाठी आलेले नागरिक संतप्त झाले. तसेच बदललेले केंद्र शोधण्यासाठी नागरिकांना कडक उन्हात पायपीट करावी लागली. 

60 दिवसानंतरही लस
कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस 45 ते 60 दिवसांच्या अंतराने घ्यावा, असे निर्देश अ ाहेत. अनेकांना पहिला डोस मिळाला, मात्र दुसरा डोस लसीअभावी थांबलेला आहे. सुमारे 11 हजारपेक्षा अधिक नागरिकांची 60 दिवसांची मुदत संपली आहे. मात्र त्यांनी घाबरून न जाता 60 दिवसानंतरही लस घेता येईल.
- डॉ. निता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

राज्यात सर्वाधिक लसीकरणाचा दावा
राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेले शहर म्हणून औरंगाबाद शहराचे नाव अग्रेसर आहे, असा दावा पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी लोकप्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा करताना केला. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती आता दूर झाली असून लस घेण्यासाठी केंद्रांव गर्दी होत आहे. हे पाहून पालिकेने यापुढे जाऊन खाजगी दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्याचे नियोजन उपायुक्त अपर्णा थेटे व पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर त्यांच्याकडे आहे. आजवर शहरात 2 लाख 48 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असून कोरोनापासून मुक्त होत आहे. मात्र आता नागरिकांचा प्रतिसाद वाढला असला तरी लस कमी पडत आहे. या मे महिन्यात लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीत लस घ्यावी, असे आवाहन आयुक्‍तांनी केले.

लसीकरणानंतरच निकाल समोर येईल  
सध्या लसीकरणावरुन मोठा गोंधळ उडालेला आहे. सुरुवातीला पहिली लस घेतल्यानंतर दुसरी 30 दिवसांनी घेण्याचे सांगितले जात होते. पण आता 60 किंवा 90 दिवसांचे अंतर ठेवा असे म्हटले जात आहे. त्यातही आता नविन संशोधन आले आहे. पहिली लस घेतली आणि कोरोनाची लागण झाली तर दुसरा डोस घेऊ नका. लसीकरण आता सुरु झाल आहे. त्याचा निकाल पुन्हा येईलच. ज्यांचे लसीकरण झाले आहे. त्यांची लक्षणे सौम्य असतील. को व्हॅक्सीनची तर सध्या चाचणीच सुरु आहे. ही लस देतानाच ही स्वत:ची जबाबदारी आहे असे लिहून घेतले जात आहे. मात्र, कोविशिल्डचे तसे नाही. जसजसे लसीकरण होईल असा निकाल समोर येईल. लस ही लगेचच तयार होत नाही. जेवढे लसीकरण वाढेल तसा कोविडच्या साखळीला बे्रक लागेल.
डॉ. सचिन फडणीस, आयएमए, उपाध्यक्ष.

एकूण लसीकरण 
2 लाख 48,259

आज फक्त 18 ते 44 वयोगटासाठी  
कोव्हॅक्सीन लस केंद     
चेतनानगर आ. कें. 
क्रांतीचौक आ. कें.     
गणेश कॉलनी आ. कें. 

कोविशिल्ड लस केंद्र
सादातनगर आ. कें.
कैसर कॉलनी आ. कें.
मुकुंदवाडी आ. कें.

आजवर शहरात झालेले लसीकरण लसीकरण
पहिला डोस 
आरोग्य कर्मचारी             26,901    
फ्रंटलाइन वर्कर्स              33,614 
18 ते 44 वयोगट            2028
45 ते 59 वयोगट            73,892
60 वर्षांवरील ज्येष्ठ       56,694

दुसरा डोस 
आरोग्य कर्मचारी      12,730   
फ्रंटलाइन वर्कर्स        10,464
18 ते 44 वयोगट       0
45 ते 59 वयोगट       13,170
60 वर्षांवरील ज्येष्ठ    18,766