मुंबई : राज्याला पुरेशा लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपेंनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 

राज्यात सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत लसींचा साठा मिळाला तर लसीकरण करता येईल. लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरूये. त्यानुसान प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असेही टोपेंनी सांगितले. राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला 1 लाख डोस मिळत आहेत. त्यामुळे सर्वांचेच लसीकरण होणे शक्य नाही. राज्याकडे फक्त दीड लाख व्हॅक्सीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लसीकरण करण्यासाठी कोविन अॅपवरून अपॉईंटमेंट घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय लस मिळणार नाही. तुम्हाला कोविन अॅपवर नोंदणी करावीच लागेल. केंद्र सरकारचे तसे आदेश आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कुणीही गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

2 कोटी डोस विकत घ्यावे लागतील...
18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून राज्यात 5 कोटी 71 लाख लोक 18 ते 44 वयोगटातील आहेत. शंभर टक्के लोकांना फ्रि लस दिली जाणार आहे. त्यासाठी राज्याला दोन कोटी डोस विकत घ्यावे लागतील. एका लसीसाठी 400 रुपये आकारले जातात. त्यानुसार 2 कोटी डोससाठी अंदाजे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. सहा महिन्यात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यात लसीकरण करायचे म्हटले तरी 12 कोटी डोस द्यावे लागतील. म्हणजे दर महिन्याला 2 कोटी डोस द्यावे लागणार आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

या लस घेणार...
कोव्हॅक्सि उत्पादक कंपन्यांकडून या महिन्यात 10 आणि पुढच्या महिन्यात 10 लाख डोस मिळतील. जुलैनंतर ते 20 लाख डोस देणार आहेत. कोविशिल्डचे प्रत्येक महिन्याला 1 कोटी डोस मिळणार आहे. तसेच रशियाची लस योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात घेण्याबाबत चर्चा सुरूये. तसेच ऑगस्टमध्ये झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून पुरवठा होईल, अशी माहितीही राजेशे टोपेंनी दिली.