मुंबई - राज्यपाल नियुक्त विधान परिषेच्या रिक्त जागांसाठी १२ सदस्यांमध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उर्मिला मातोंडकर यांना स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. १२ जागांसाठी या तिनही पक्षात चढाओढ सुरु आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी फोन करुन उर्मिला यांच्याशी बातचीत केली असून उर्मिला मातोंडकर यांचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारीही दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'याबाबत माझ्याही कानावर चर्चा आली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळात निर्णय घेतले जातात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात मंत्रिमंडळाने अधिकार दिले आहेत.'
भाजपचा हात सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी संधी दिली जाऊ शकते. तसेच सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होण्याची चिन्हे आहेत.
तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनादेखील उमेदवारी मिळू शकते. वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी माघार घेणाऱ्या माजी आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचीही या जागेवर वर्णी लागू शकते.