नवी दिल्ली : देशातील कोरोना संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. केंद्र आणि राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र कोरोनाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ९२ हजार ४८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. २४ तासांत देशात ३ लाख ९२ हजार ४८८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर ३ हजार ६८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याच कालावधीत देशभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख १५ हजार ५४२ हजार इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात ८०२ रूग्णांचा मृत्यू
राज्यात शनिवारी ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित आढळून आले. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के आहे.