औरंगाबाद / प्रतिनिधी

  सर्वसामान्य रुग्णांच्या कोरोना उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार केले जातात. तरीदेखी खासगी रुग्णालये रुग्णाकडून पैसे उकळतात. मग योजनेसाठी आलेला कोट्यवधींचा निधी जातो कुठे ? ही योजना म्हणजे खासगी रुग्णालयांसाठी तयार केलेल्या योजना असल्याचा स्पष्ट आरोप लोकप्रतिनिधींनी सोमवारी केला.

  कोरोना उपाययोजनेत पारदर्शकता राहावी यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात दर सोमवारी संयुक्त बैठक घेतली जाते. यात आठवड्याचा आढावा घेतला जातो. या अनुषंगाने सोमवार, 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक पार पडली. यावेळी खा. इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत होत असलेल्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे केले. बैठकीनंतर दालनाबाहेर लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी संवाद साधत अधिक माहिती दिली. खा. इम्तियाज जलील म्हणाले कि, महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणजे खासगी रुग्णालयांच्या लाभासाठी तयार केली योजना असल्याचे दिसून येते. कोरोना उपचाराला आरोग्य योजनेत समाविष्ट करूनदेखील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांकडून उपचाराचे पैसे वसूल केले जात आहेत. कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी खासगी रुग्णालयांविरोधात उघडलेला मोर्चा योग्यच आहे. एका-एका रुग्णालयाला 30 ते 40 कोटींचा निधी दिला जात आहे. तरीदेखील रुग्णांकडून पैसे का वसूल केले जात आहे असा सवाल खा जलील यांनी उपस्थित केला. यासाठी सर्व रुग्णांचे नाव वेबसाईटवर जाहीर करावे अशी आम्ही मागणी केली मात्र प्रशासनाने याला नकार दिला असल्याने योजनेत शंका निर्माण होत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत रुग्णांची यादी जाहीर करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे खा. जलील यांनी सांगितले. कोचिंग क्लास, काळीपिवळी टॅक्सी आणि टायपिंग इन्स्टिट्यूट उघडण्यासाठीदेखील प्रतिनिधींनी प्रशासनाकडे यावेळी आग्रह केला.

केंद्राचे व्हेन्टिलेटर्स खासगी रुग्णालयांना !

  केंद्राने शासकीय रुग्णालयाला दिलेले व्हेन्टिलेटर्स कुठे गेले असा सवाल लोकप्रतिनिधींनी बैठकीत प्रशासनाला विचारला. यावर प्रशासनाने सांगितले कि, एमजीएमला 10, ऍपेक्सला 2, माणिक हॉस्पिटलला 3, वाय एस खेडकरला 5, सावंगीकरला 2 व्हेन्टिलेटर्स देण्यात आले आहेत. मुळात 60 व्हेन्टिलेटर्स हे सिव्हिल रुग्णालयासाठी उपलब्ध करण्यात आले होते. मात्र सिव्हिल रुग्णालयाने स्वतःकडे केवळ 7 व्हेन्टिलेटर्स ठेवत उर्वरित सर्व व्हेन्टरीलेटर्स हे खासगी रुग्णालयांना दिले आहेत. हे चुकीचे असून ही खैरात का वाटली गेली असा परखड सवाल खा. इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.

- सरकार अंधी-बेहरी : खा. जलील
  यावेळी खा. इमित्याज जलील यांनी विविध संस्थांना आपल्या आस्थापना सुरु करण्याचे आवाहन केले. सरकारच्या आदेशाची वाट न पाहता प्रत्येकाने आपल्या संस्था सुरु कराव्या. आज प्रत्येकाच्या घरी कुटुंब उपाशी आहे. कमविण्याचे साधन बंद असल्याने मोठे प्रश्‍नचिन्ह समोर उभे आहे. मात्र ही सरकार अंधी आणि बेहरी आहे. त्यांना काही दिसत नाही व ऐकूही येत नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा न करता आपापली दुकाने सुरु करा. इम्तियाज जलील तुमच्या सोबत आहे असा विश्‍वास त्यांनी नागरिकांना दिला.