नवी दिल्ली : मागील वर्षीपासून देशात कोरोनाशी मोठा लढा सुरू आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात कोरोनासाठीचे लसीकरण देखील सुरू झाले. मात्र, अजूनही देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशातच आता झायडस कॅडिला या कंपनीचे विराफिन हे औषध कोरोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी डीसीजीआय अर्थात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.

येत्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर सातव्या दिवशी कोरोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केलाय.

झायडसने जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचे प्रमाण ९१.१५ टक्के आहे. अर्थात, हे औषध दिलेल्या कोरोना बाधितांपैकी ९१.१५ टक्के रुग्णांचे अहवाल हे सात दिवसांत निगेटिव्ह आलेय. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्स प्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आलेय. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच, रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीने केलाय.