औरंगाबाद / प्रतिनिधी

  जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालयासह विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. यासोबतच शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोरोना रूग्णांवर उपचार करण्यास मुभा दिली आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयात विशिष्ट खाटा उपलब्ध ठरवून दिल्या आहेत. यातच पालिकेच्या अहवालानुसार हजारापेक्षा अधिक खाटा रिकाम्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र काही खासगी रुग्णालयांकडून खाटाच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना भरती करण्यास टाळले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आता प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रशासन अशा रूग्णालयांवर कारवाई करणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
  मागील पाच महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरतो आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कोरोना रूग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, या उद्देशाने सरकारी रुग्णालये, पालिकेची कोविड केअर सेंटर यासह काही खासगी रुग्णालयांना देखील उपचाराची सेवा देण्यास मान्यता दिलेली आहे. या सर्व रूग्णालयांची एकत्रित संख्या 17 आहे. त्यांच्या माध्यमातून 3084 खाटा उपलब्ध केलेल्या आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त खाटांना ऑक्सिजनची सुविधाही आहे. औरंगाबाद शहर व परिसरात दररोज बाधितांची संख्या अडिचशे ते तिनशेच्या घरात आढळत आहे. दररोज कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या देखील जवळपास तेवढीच आहे. त्यामुळे खाटांची उपलब्धता असल्याचे सहजच स्पष्ट होत आहे. मात्र पालिकेच्या माध्यमातून शनिवारी रात्री आठ वाजता मिळालेल्या अहवालानुसार 3 हजार 84 खाटांपैकी 1 हजार 36 खाटा विविध रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये मिळून रिकाम्या होत्या. रविवारी देखील कमी-अधिक प्रमाणात खाटा रिक्त होत्या. मात्र काही रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी नकार दिला जात असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. खाटा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून त्यांना उपचाराची सेवा देण्यास टाळले जात आहे. प्रशासन यावर कारवाई करणार का? असा प्रश्‍न आहे.

या ठिकाणी आहेत खाटा रिक्त

पालिकेच्या प्राप्त अहवालानुसार धुत हॉस्पिटलमध्ये शंभर पैकी 19, सीएसएमएसएस मध्ये सर्वच 69, पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये सर्वच 180 तर मेल्टॉनच्या सेंटरमध्ये 300 पैकी 40 खाटा रिकाम्या आहेत. सिपेटमधील सर्वच्या सर्व 270 खाटा रुग्णांना ताब्यात दिल्या आहेत, या ठिकाणी खाटा उपलब्ध नाहीत. पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्वच 123 खाटा रिक्त आहे. एमजीएम मध्ये 274 पैकी 62 खाटा रिकाम्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. घाटी रुग्णालयात 458 पैकी 142 खाटा रिक्त आहेत. डॉ. हेडगेवार रुग्णालयात 58 पैकी 9 खाटा रिक्त आहेत. तर बजाज हॉस्पिटलमध्ये 49 पैकी 12 खाटा रिकाम्या आहेत. मिनी घाटी मध्ये 200 पैकी 30 खाटा रिकाम्या आहेत. देवगिरी कॉलेज बॉइट होस्टेलमध्ये 220 पैकी 3 खाटा रिकाम्या आहेत. तसेच एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्समध्ये 70 पैकी 14 तर एमआयटी कॉलेज बीडबायपास येथे 265 पैकी 22 खाटा रिकाम्या असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

आता 20-25 खाटांच्या दवाखान्यांनाही परवानगी..........

शहरातील मोठ्या रुग्णालयांना आतापर्यंत उपचारासाठी परवानगी दिली होती. आता वीस-पंचेवीस बेडस् असलेल्या दवाखान्यांना देखील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे, दोन दवाखान्यांचे प्रस्ताव सध्या प्राप्त झाले आहेत. औरंगाबाद शहराबरोबरच ग्रामीण भागातून आणि मराठवाड्यातून औरंगाबादमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

या प्रकरणात लक्ष घालता येईल...........

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी विविध रूग्णालयांना भेटी दिल्या. तेव्हा काही ठिकाणी बर्‍याच खाटा अक्युपाय झालेल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. खाटा उपलब्ध होत नसल्याबद्दल काही तक्रारी असतील त्यात लक्ष घालता येईल.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.