औरंगाबाद / प्रतिनिधी,


कोरोनाचा संसर्ग शहरात वाढत चालला आहे. मंगळवारी दि.8 तब्बल 486 रूग्ण निघाल्याने यंत्रणेला धक्काच असला आहे. कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नसून नागरिक विनामास्क बिधनास्त वावरत आहे. सोशल डिस्टसिंगही पाळत नाही, गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरात विनामास्क फिरणार्‍यांवर महापालिका-पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी पोलीस आयुक्तालयातील बैठकीत पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय व पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या उपस्थितीत धोरण ठरविण्यात आले.
पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त पांडेय आणि पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांची पोलीस मुख्यालयात कोरोनाविषयी संयुक्त घेण्यात आली. या बैठकीत पालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या सात सुत्री उपाययोजनेची माहिती प्रशासकांनी दिली. एमएचएमएच अ‍ॅप्लीकेशन, शहरातील व्यापार्‍यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट, सिटी एन्ट्री पाइंटवर नागरिकांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट, स्पेशल टास्क फोर्सची स्थापना, एक हजार मोबाईल फिवर क्लिनिक, चोविस बाय सात अंतर्गत चालणारे कंट्रोल रुम, स्मार्ट सिटी बसचा रुग्णवाहिका म्हणून वापर आणि औद्योगिक कामगारांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट याचा समावेश आहे. या सात सुत्री उपाययोजना पालिकेकडून शहरात राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत शहरातील एकूण रुग्ण संख्या 17,056 इतकी झाली आहे. यात 12,485 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. आजघडीला कोरोनाचे संक्रमित रुग्ण 3,997 आहेत. तसेच प्रामुख्याने व्यापारी यांना दुकानात थर्मलगन व पल्स ऑक्सिमीटर ठेवणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.


पहिल्यांदा दंड, दुसर्‍यांदा गुन्हा दाखल
वारंवार सूचना करूनही मोठया प्रमाणात नागरिक विनामास्क बाहेर वावरत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सचा वापर न करता दैनंदिन व्यवहार करत आहेत. यामुळेच शहरातील रुग्ण संख्या वाढत आहे. आजवर पालिकेने शहरात विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली आहे. यापुढेही अशीच कारवाई पालिका व पोलीस प्रशासन आता संयुक्तपणे राबवेल, असा निर्णय बैठकीत झाला. या कारवाईअंतर्गत पहिल्यांदा विनामास्क आढळ्यास 500 रुपये दंड तर दुसर्‍यांदा आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर मुंबई पोलीस अधिनियम व भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठरले आहे.