नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस टोचली जाणार आहे. भारतात 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरी देण्यात आलीय. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाईल.

भारत बायोटेक कंपनीला 2 ते 18 वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची ट्रायल करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (एसईसी) शिफारस केली होती. त्याला मंगळवारी मंजुरी दिली आहे. ही क्लिनिकल ट्रा्यल 525 मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही ट्रायल होणार आहे. कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज 3 ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज 2 चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.

2 ते 18 वर्षांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज 2 आणि फेज 3च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी द्यायला हवी, अशी शिफारस एसईसीने केली होती. भारतात वापरल्या जाणाऱ्या दोन व्हॅक्सिन केवळ 18 वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. देशात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जातोय.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिलाय. तिसरी लाट येणार असून या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलेय.