नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्र येऊन या औषधांची निर्मिती केली आहे. या औषधाला सध्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज (2-DG) असे नाव देण्यात आले आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजला दिलेली आहे. 

सध्या कोरोना रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होण्याची समस्या वाढली आहे. यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी 2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. कारण क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोना रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी कालावधीत कोरोनावर मात करत आहेत. 

डीआरडीओच्या वैज्ञनिकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधावर काम सुरु केले होते. यावेळी कोरोनावर हे औषध अत्यंत 
प्रभावशाली असल्याचे वैज्ञानिकांच्या निदर्शनास आले होते. या आधारे डीसीजीआयने मे 2020 मध्ये या औषधाच्या फेज 2 ट्रायलला मंजुरी दिला. 2DG औषधाच्या ट्रायलचा पहिला टप्पा सहा रुग्णालयांत घेतला आणि देशभरातील 11 रुग्णालयात फेज क्लिनिकल चाचणी घेतली. दुसर्‍या टप्प्यात 110 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेतली.