नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या घटत असली तरी सण-उत्सवाच्या तोंडावर कोरोनाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक राज्यात कोरोनाचा प्रदुर्भाव अद्याप दिसून येत आहे. देशात मागील २४ तासांत ४७ हजारांच्या जवळपास नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संक्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की, देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पाच लाख ७० हजार ४५८ जणांवर उपचार सुरु आहेत. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख २२ हजार १११ इतकी झाली आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात १० लाख ९१ हजार २३९ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात शनिवारी ५,५४८ रुग्णांची नोंद झाली, तर ७,३०३ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार ३५३ बाधित बरे होऊन घरी परतले. सध्या २५ लाख ३७ हजार ५९९ व्यक्ती गृहविलगीकरणात, तर १२ हजार ३४२ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.