औरंगाबाद : महापालिकेची 1400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी दि.7 पहाटे पाऊणे तीन वाजता हॉटेल विट्स समोरील अ‍ॅपोलो टायर दुकानाजवळ अचानक फुटली. पाण्याच्या उच्च दाबामुळे सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त उंच पाण्याचे फवारे उडाले. माहिती मिळताच पालिकेने पाणीपुरवठा बंद केल्यानंतरही वाहिनीमधील लाखो लिटर पाणी रस्त्यावर, आसपासच्या दुकानात आणि बन्सीलालनगरातील घरांत शिरल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी दिवसभरात दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

जुन्या शहराला आज मिळेल पाणी : रविवारी दिवसभर नक्षत्रवाडीतून सिडको-हडकोला पाणीपुरवठा करणारी एक्स्प्रेस वाहिनी सुरु होती. मात्र क्रांती चौक जलकुंभावरील भागासह पूर्ण जुन्या शहराला विस्कळीत झाला होता. आता एक दिवस विलंबाने सोमवारी या भागांना पाणी मिळणार आहे. तसेच रविवारी रात्री शक्य होईल त्या भागांत पाणीपुरवठा करणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.