औरंगाबाद : मागील आठवड्यात एक दिवसाच्या अंतराने दोन दिवस तब्बल 18 तास जायकवाडी धरणातून महापालिकेच्या पंपगृहावरील पाणी उपसा बंद होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णतः बिघडले आहे. पाणी वितरणाचे टप्पे विस्कळीत झाल्याने ते सुरळीत करण्यासाठी आता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. तथापि, शहराचा पाणीपुरवठा दिवाळीपर्यंत विस्कळीतच राहण्याची शक्यता अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.
 चार दिवसांपूर्वीच शुक्रवारी दि.22 ऑक्टोबर रोजी पैठण क्षेत्रातील चितेगाव परिसरात महावितरण कंपनीने 220 केव्ही उपकेंद्र व 33 केव्ही विद्युत वाहिनीवर ब्रेकर तसेच तातडीच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी तब्बल सात तासांचा वेळ घेतला. या काळात पालिकेच्या पंपगृहाचा वीजपुरवठा बंद असल्याने तब्बल 9 तास शहराचे पाणी बंद होते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले होते. हे टप्पे सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग तारेवरची कसरत करीत असतानाच रविवारी दि.24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी 1400 मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलयोजनेवरील पंपगृहास वीजपुरवठा करणार्‍या सबस्टेशनवरील जॉइंटचे केबल जळाले. त्यामुळे पाणी उपसा बंद झाला. या जॉइंटची दुरूस्ती पाणी उपसा सुरू करण्यासाठी देखील 9 तासांचा अवधी लागला. शुक्रवारी व रविवारी दोन दिवस तब्बल 18 तास पाणी उपसा बंद असल्याने शहरातील पाणी वितरणाचे टप्पे पूर्णतः विस्कळीत झाले आहे. ते सुरळीतरित्या पूर्वपदावर आणण्यासाठी आता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची कसरत सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील, पुन्हा त्यात काही अडथळा येवू नये, यासाठी पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी मंगळवारी दि.26 ऑक्टोबर रोजी जायकवाडी पंपगृह, फारोळा जलशुद्धीकरण येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच कर्मचार्‍यांना काही सूचना केल्या. 

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न : सगल दोन दिवस मोठा गॅप पडल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. दिवाळीपर्यंत वितरणाचे टप्पे सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- किरण धांडे, कार्यकारी अभियंता, मनपा.