वैजापूर : वैजापूर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल संध्याकाळपर्यंत एकूण 2686 अर्ज दाखल झाले. आज छाननी सुरू असताना 2015ची ग्रामपंचायत निवडणूक लढवून निवडणूक विभागाला जमा खर्चाचा तपशील न दिलेल्या 87 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. वैजापूर तालुक्यातील एकूण 105 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. 907 जागांसाठी एकूण 2686 अर्ज प्राप्त झालेले आहे.
वैजापूर तालुक्यात होणार्‍या 105 ग्रामपंचायती आठ दिवसापूर्वी बिनविरोध होतील, अशी चर्चा सुरू असताना एकही ग्रामपंचायत अद्याप बिनविरोध झालेली नाही. वैजापूर तालुक्याचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी बिनविरोध जाहीर होणार्‍या ग्रामपंचायतीला निधी म्हणून वीस लाख रुपये देणार असल्याचे घोषित केले होते. आठ दिवसांपासून बिनविरोधच्या चर्चेत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीत विरोधक उभे आहेत. तेथेही ग्रामपंचायत निवडणूक होईल, असे चित्र आहे. त्यामुळे 20 लाख रुपयांच्या बक्षिसांवर इच्छुकांनी पाणी सोडलेले दिसते. 

कोरोनाची ऐसी की तैसी... : वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी  होती. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणारे,  विद्यमान  सरपंच, सदस्य कार्यकर्ते  विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात जमा  झाले होते. अनेकांच्या तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधलेले नव्हते. त्यामुळे कोरोना वैजापूर तालुक्यातून हद्दपार झालेला आहे, असेच वाटत होते. प्रशासनानेही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.