औरंगाबाद : कोरोना झालेला असेल तर आपणास लस घेता येते का? किंवा केव्हा घेता येईल, असा प्रश्न कोरोना होऊन गेलेल्या अनेकांना पडला असेल. याविषयी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी खुलासा केला आहे. कोरोना झालेला असल्यास संबंधित व्यक्तीस चार किंवा आठ आठवड्यांनी कोरोना लस घेता येते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाच्या नियोजनाप्रमाणे औरंगाबाद शहरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील शासकीय व खासगी रूग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी व नर्ससह इतर कर्मचारी वर्गाचे लसीकरण केले जात आहे. मात्र सुरूवातीच्या तीन ते चार दिवसांत कोरोना लसीकरण मोहिमेला पुणे शहराप्रमाणेच औरंगाबदेतही अल्प प्रतिसाद मिळाला. त्यातच कोरोना काळात फ्रंडलाइनवर असलेल्या कोरोना योद्धांनी अर्थातच प्रमुख अधिकार्‍यांकडूनही ही लस घेण्यास  टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले. कोव्हिन अ‍ॅपमध्ये आपला नंबर लागलाच नाही, असे कारण पुढे करत अनेक प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोरोनाची लस घेण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र यासंबंधीचे वृत्त प्रकाशित होताच कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व प्रमुख अधिकार्‍यांनी शुक्रवारी दि.22 धुत हॉस्पीलटमध्ये लस टोचून घेतली. त्याच दिवसापासून लसीकरणाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत लाभार्थ्यांनी काय पूर्वतयारी करावी आणि कोरोना झाला असल्यास त्या व्यक्तींना कोरोना लस घेता येते का? या प्रश्नांबाबत आरोग्य यंत्रणेकडून खुलासा करण्यात आला नव्हता. याविषयी दै. आदर्श गावकरीने पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना शुक्रवारी धूत येथील लसीकरण केंद्रावर विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशांना कोरोना झाल्यापासून चार किंवा आठ आठवड्यांनी कोरोनाची लस घेता येते. चार आठवड्यानंतर लस घेता येते का, असा प्रश्न त्यांना केला असता किमान आठ आठवड्यांनी लस घेता येते. असे शासनाचेच निर्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपाशीपोटी घेतल्यास रिअ‍ॅक्शनचा धोका : कोरोनाची लस घेण्यास येताना पोट खाली नसावे. थोडासा नाष्टा तरी किमान केलेला असावा. त्यामुळे रिअ‍ॅक्शन येण्याची शक्यता कमी असते. कोरोना लसीमुळे उलटी, मळमळ, काहीसा ताप येणे ही साधी लक्षणे आहेत. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे प्रत्येकाने मनात भीती न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.