औरंगाबाद :
शहरातील स्मार्ट सिटीबस राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत स्वस्त सिटीबस म्हणून ओळखली जाते. मात्र, प्रवाशांनी या सिटीबसेसला प्रतिसाद देऊनही सर्वात स्वस्त असलेल्या स्मार्ट सिटीबसचा वषार्चा तोटा तब्बल सात कोटी ८७ लाख रुपये आहे. सिटीबस सेवेचा संचालक मंडळाने नुकताच आढावा घेतल्या त्यात ही बाब स्पष्ट झाली आहे. स्मार्ट बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, या कार्डला टॉप अप मारता येणार असून हे कार्ड रिचार्ज देखील करता येणार आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेवून महापालिकेसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सिटीबस सेवा सुरु करण्यात आली. २६ जानेवारी २०१८ रोजी या बससेवेचा शुभारंभ झाला. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील व देशातील इतर शहरातील सिटीबसच्या तुलनेत कमी तिकीट दर ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. विशेष म्हणजे आजही तो निर्णय कायम आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटीबसच्या तिकीट दराचे प्रमाण ५३ टक्के आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दराचे प्रमाण ६३ टक्के असून नागपूर येथील सिटीबसच्या तिकीट दराचे प्रमाण ७७ टक्के आहे. मध्यंतरीच्या काळात डिझेलचे दर वाढत गेले पण औरंगाबादच्या स्मार्ट बसचे तिकीट दर मात्र वाढवण्यात आले नाही. या सिटीबसच्या तिकीट दराची सुरुवात पाच रुपयांपासून होते. दोन स्टेजसाठी (टप्प्यांसाठी) पाच रुपये तिकीट आकारले जाते. दोन किलोमीटसाठी दोन रुपये आकारले जातात.
कमी तिकीट दरामुळे स्मार्ट बसला वषार्ला सात कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बद्दलचा आढावा संचालक मंडळाने घेतला आणि तिकीट दर स्थीर ठेवण्याचे देखील ठरवण्यात आले. सिटीबसचा होणारा तोटा अन्य मार्गाने भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला देखील मान्यता देण्यात आली.


आता देणार स्मार्ट कार्डः
स्मार्ट सिटीबसने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी आता स्मार्ट कार्डची योजना आखण्यात आली आहे. याचा उपयोग प्रामुख्याने विद्यार्थ्यांना होणार आहे. स्मार्ट कार्डवर टॉप अप मारता येणार असून, हे कार्ड रिचार्ज देखील करता येणार आहे. त्याशिवाय वाहकांला अँडरॉइड बेसड् मशीन तिकीटासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला केवळ तीन सेकंदात तिकीट मिळेल. या मशीनमध्ये कार्ड पेमेंट करण्याची देखील सुविधा आहे. या मशिनचे प्रशिक्षण सोमवारी वाहकांना देण्यात आले आहे.