औरंगाबाद: कोरोनामुळे घेतलेल्या लॉकडाऊन काळापासून बंद झालेली शहरातील स्मार्ट बससेवा आता सुरू होणार आहे. मात्र स्मार्ट बसेस टप्प्या टप्प्याने सुरू केल्या जातील, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दि.1 दिली. स्मार्ट सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी स्मार्ट बसमध्ये प्रवाशांच्या संख्येवर देखील निर्बंध घातले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता नव्याने स्मार्ट सुरू करताना पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत बैठक झाली. स्मार्ट बससाठी ठराविक वेतनावर चालक घेण्याची परवानगी या बैठकीत देण्यात आल्याचेही आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे स्मार्ट बससेवा बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने मार्च मध्ये घेतला. या निर्णयानुसार स्मार्ट बसची सेवा आजपावेतो बंदच आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शासनाने 1 ऑक्टोबरपासून नवीन अनलॉक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार आंतरराज्यीय रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. एसटी महामंडळाची बससेवा देखील यापूर्वीच सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात स्मार्ट बसची सेवा सुरु केली जाणार आहे का, असे पत्रकारांनी पालिकेचे आयुक्‍त पांडेय यांना गुरूवारी विचारले. त्यावर त्यांनी सांगितले की, दिवाळी-दसरा सणाच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात टप्प्या टप्प्याने सिटी बस सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. ही सेवा सुरू करताना स्मार्ट बस मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येवर देखील निर्बंध घातले जातील, जेणे करुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

बस डेपोसाठी मनपाचे प्रयत्न:
स्मार्ट बससंदर्भात दोन दिवसापूर्वीच मुंबईत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिती बैठक झाली. याबाबत पांडेय यांनी सांगितले की, स्मार्ट बसच्या डेपोसाठी एसटी महामंडळाची मुकुंदवाडी व रेल्वेस्टेशन येथील जागा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला देणे, ठराविक वेतनावर कंत्राटी चालकांची नियुक्ती करणे आणि एसटी महामंडळातर्फे औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकाचे बांधकाम केले जाणार आहे. या बांधकामासाठी विकास शुल्कात सुट देणे हे तीन विषय बैठकीत चर्चीले गेले. बसडेपोच्या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय परिवहन मंत्री घेतील, असे या बैठकीत ठरले.

चालकांची प्रतीक्षा यादी तयार:
आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले की, एसटी महामंडळाने चालक या पदावर पंधरा हजार रुपये ठराविक वेतनावर काम करण्यासाठी मुलाखती घेवून भरतीसाठी चालकांची प्रतीक्षा यादी तयार केली आहे. या यादीतील उमेदवारांना स्मार्ट बससाठी नियुक्त करण्याचे ठरले आहे. विकास शुल्कात सुट देण्याबद्दल मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.