औरंगाबाद - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवून औरंगाबाद जिल्हा कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण निर्मुलन करण्याच्यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने या सर्वेक्षणाची तयारी केली आहे. शहरात दाट लोकसंख्या असलेल्या 41 वसाहतींत हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम संदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यानुसार निदान न झालेल्या कुष्ठरुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार आहे. तसेच नवीन संसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी क्षयरोग शोध मोहिमेंतर्गत पथकांद्वारे गृहभेट देऊन संशयितांचा शोध घ्यावा. संशयित क्षयरुग्णाचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करून त्वरित औषधोपचार सुरु करावेत, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या आहेत.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. शेळके, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे सहायक संचालक डॉ. ए.बी.धानोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अविनाश बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीतील सूचनांनुसार आता पालिका प्रशासनाने सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे.

2.74 लाख नागरिकांची तपासणी
जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार पालिकेने शहरातील कुष्ठरोग व क्षयरोग संशयितांचे सर्वेक्षण करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील कुष्ठरोग व क्षयरोगाच्या दृष्टीने दाट लोकवस्ती असलेल्या प्रमुख 41 वसाहतींत सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी 157 पथके तयार केली आहेत. 46 सुपरव्हायझरच्या नियंत्रणाखाली ही पथके काम करतील. या पथकांकरवी शहरातील 54 हजार 930 घरांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यात 2 लाख 74 हजार 651 नागरिकांची तपासणी केली जाईल.

अधिक लोकसंख्येच्या भागात सर्वेक्षण
दाट लोकसंख्येच्या नारेगाव, मिसारवाडी, कैलासनगर, चिकलठाणा, जयभवानीनगर, मुकूंदवाडी, हर्षनगर, जवाहर कॉलनी, राजनगर, पीरबाजार, भीमनगर, सातारा, देवळाई, विजयनगर, बायजीपुरा, एन-8 सिडको, एन-11, गांधीनगर, शहाबाजार, शिवाजीनगर, नक्षत्रवाडी, भवानीनगर, बन्सीलालनगर, आरेफ कॉलनी, गरम पाणी, जिन्सी, मसनदपुर, पुंडलीकनगर, छावणी, सादातनगर, भावसिंगपुरा, नेहरूनगर, कैसर कॉलनी, जुनाबाजार, क्रांतीचौक, सिल्कमिल कॉलनी, हर्सूल, चेननानगर, अंबिकानगर या भागात हे सर्वेक्षण होणार आहे.