औरंगाबाद / प्रतिनिधी,


लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले तसेच साईबाबांची प्रकटभूमी म्हणून ओळख असलेले श्री क्षेत्र धूपखेडा (धुपगाव) येथे जाण्यास भाविकांना पक्का रस्ता नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. साईभक्तांची गरज लक्षात घेता प्रशासनाने धूपखेड्याला जोडणार्‍या कऊटगाव फाटा ते दहेगाव फाटा पक्का डांबरी रस्ता त्वरित तयार करून द्यावा, अशी विनंती आदर्श उद्योग समूहाने सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आदर्श समूहाने निवेदनात म्हंटले आहे की, पैठण तालुक्यातील धुपगाव हे लाखो साईभक्तांचे श्रध्दास्थान आहे. शिर्डीच्याही आधी साईंचे प्रथम दर्शन येथेच झाल्याने या भूमीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यामुळे देश विदेशातून येथे साईभक्त तसेच लोकप्रतिनिधी मंडळी दर्शनासाठी नियमितपणे येत असतात. परंतु धूपखेड्याला जोडणार्‍या रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. औरंगाबाद-पैठण रोडवरून कऊटगाव ते धूपखेडा असा रस्ता बर्‍याच वर्षांपूर्वी झाला होता मात्र त्याची अवस्था आज बिकट झाली आहे. हा रस्ता झाल्यास भाविकांची मोठी अडचण दूर होणार असल्याचे आदर्श समूहाचे संस्थापक अध्यक्ष अंबादासराव मानकापे पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे.
देशविदेशातील साईभक्तांना दर्शनासाठी शिर्डीवरून औरंगाबाद येथे यावे लागते व औरंगाबाद येथे कऊटगाव फाटा ते धूपखेडा येथे जावे लागते. याबाबत शिर्डी ते धूपखेडा नगर रोड मौजे दहेगाव बंगला नगरफाटापासून रोडची बांधणी करण्यात यावी, अशी विनंती यापूर्वी अनेकवेळा करण्यात आलेली आहे. परंतु याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाबद्दल साईभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याबाबत धूपखेडा साईसाधनाश्रमचे प्रमुख स्वामी बलदेवजी भारती महाराज यांनी यापूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाकडे तीर्थक्षेत्र विकासासाबाबत पत्र दिलेले असून तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात शासनाकडे प्रस्तावही सादर केलेला आहे. त्यामुळे कऊटगाव फाटा पैठण ते नगर रोड दहेगाव फाटा असा डांबरी रस्ता करून द्यावा अशी विनंती समस्त साईभक्तांकडून आदर्श उद्योग समूहाचे अध्यक्ष अंबादासराव मानकापे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.