औरंगाबाद : जालन्याच्या कोविड सेंटरमधील कामगाराने रेमडेसिवीर इंजेक्शन लांबवले. त्यांची काळ्याबाजारात चढ्या भावाने विक्री करताना गुन्हे शाखा पोलिसांनी कामगारासह सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडून पाच इंजेक्शन, सहा मोबाइल आणि कार असा पाच लाख 64 हजार 587 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना एक मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी बुधवारी दि.28 दिले. आरोपींमध्ये शहरातील दोघांचा तर जालना जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. दिनेश कान्हु नवगीरे (28, रा. जयभीमनगर, गल्ली क्र. 3), रवि रोहिदास डोंगरे (रा. भाग्यनगर,औरंगाबाद), महावितरण कंपनीतील संदीप सुखदेव रगडे (32), प्रविण शिवनाथ बोर्डे (27, दोघेही रा. आंबेडकरनगर, ता. बदनापुर), नरेंद्र मुरलीधर साबळे (33, रा. समतानगर, ता. बदनापुर) आणि  नगर परिषदेतील कंत्राटी कामगार अफरोज खान इकबाल खान (रा. बदनापुर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजगोपाल बजाज (55) यांनी फिर्याद दिली असून न्यायालयात सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी बाजू मांडत आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.