औरंगाबाद - मागील दोन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागील आठवड्यात दोनअंकावर आलेली रूग्णवाढ पुन्हा शंभरीपार गेली आहे. परिणामी, रूग्णसंख्या वाढताना 95 टक्क्यांच्या पुढे गेलेला कोरोनाचा शहरातील रिकव्हरी रेट (बरे होणार्‍या रूग्णांचे प्रमाण) घटू लागला आहे. सध्याचा कोरोनाचा शहरातील रिकव्हरी रेट 94.824 एवढा नोंदला गेला आहे.

औरंगाबाद शहरात बाजारपेठांत खरेदसाठी दिवाळीच्या दिवसांत झालेली गर्दी पुन्हा कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत आहे. अद्यापही दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठांत गर्दी दिसून येत आहे. या गर्दीवर अंकुश ठेवण्याकडे मात्र महापालिका व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दिवाळी सणाच्या दिवसांत बाजारपेठांत होणार्‍या गर्दीचे परिणाम पंधरा दिवसांनी दिसतील, असे भाकीत आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी केले होते. पालिका प्रशासनानेही कोरोना रूग्णवाढीचा धोका व्यक्‍त करत नागरिकांना बाजारपेठांत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आता पुन्हा शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे.

बुधवारी दि.18 जिल्ह्यात 138 कोरोना रूग्ण नव्याने आढळले. तर दुसर्‍या दिवशी गुरूवारी दि.19 रोजी तब्बल 170 रूग्णांची वाढ झाली. विशेष म्हणजे या रूग्णवाढीत शहरातील रूग्णांचेच प्रमाण अधिक असल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दुसरीकडे रूग्णसंख्या वाढताच कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील घसरला आहे. गुरूवारी पालिका प्रशासनाकडून प्राप्‍त अहवालानुसार कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.824 एवढा नोंदला गेला आहे. तर मागील आठवड्यातच शहराचा हा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदला गेला होता. त्यावेळी रूग्णसंख्या दोन अंकावर आल्याने यंत्रणेसह नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा चिंता वाढली आहे.

दुसर्‍या लाटेतील मृत्युदर चिंताजनक
औरंगाबादेत सुरूवातीपासूनच मृत्युदराचे प्रमाण अधिक राहिले आहे. त्यातच आता कोरोनाची दुसरी लाट जानेवारी-फे ब्रुवारी महिन्यात येण्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्‍त केला आहे. मात्र आतापासूनच शहरात पुन्हा रूग्णांची संख्या वाढू लागल्याने औरंगाबादेत दुसरी लाट डिसेंबर महिन्यातच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाचा मृत्युदर अधिक असल्याने औरंगाबादसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे. शहराचा सध्याचा मृत्युदर हा 2.992 एवढा आहे.