औरंगाबाद : शहरात दरोड्याच्या तयारीने कारमधून आलेल्या पुणे-अहमदनगरच्या टोळीला जिन्सी पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पाठलाग करून पकडले. ही कारवाई सावरकर चौक ते आझाद चौकदरम्यान करण्यात आली. यात तीन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले तर दोघे पसार झाले. त्यांच्या कारमधून पोलिसांनी लोखंडी पाईप, दोरी, मिरची पावडर, एअरगन हस्तगत केली आहे.
सुनील अंकुश मळेकर (24, रा. दानेप जिल्हा परिषद शाळेजवळ ता. वेल्टा, जि. पुणे, ह. मु. आळंद फाटा, गैवते वस्ती, चाकण, ता. हवेली, जि. पुणे), शेख नशीर शेख बशीर (26, रा. करंजगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर), शेख सलीम शेख बाबु (26, रा. खटकाळी, ता. राहुरी जि. अहमदनगर) अशा तीन दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले. तिघांची न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. तर समीर शब्बीर शेख (रा. खटकाळी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) आणि साहील शमसोद्दीन सय्यद (रा. पोखरी, जि. अहमदनगर) हे दोन दरोडेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. जिन्सी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास एक कार (एमएच 12-ओएफ 5104) सावरकर चौक ते आझाद चौक दरम्यान संशयास्पद फिरताना निदर्शनास आली. त्यामुळे गस्तीवरील सहायक फौजदार नजीर पठाण व पोलिस शिपाई संतोष वाघ यांनी कारचा पाठलाग सुरु केला. पोलिसांचे वाहन पाठलाग करत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी कार उभी करून धुम ठोकली. त्यांचा पोलिस कर्मचारी वाघ यांनी पाठलाग केला. त्यांनी शेख नशीर याला पकडले. तसेच सहायक फौजदार नजीर पठाण व काकडे यांनी सुनील मळेकर आणि शेख सलीमला कारमध्ये पकडून ठेवले. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन समीर शेख आणि साहिल सय्यद हे दोन दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर जिन्सी ठाण्याचे उपनिरिक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या दरोडेखोरांच्या कारची झडती घेत एक स्टीलचा मोठा पाईप, लोखंडी रॉड, दोरी, एअर गन, मिरची पावडर असे साहित्य आढळून आले. या दरोडेखोरांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके करत आहेत.

या पथकाने केली कामगिरी : ही कामगिरी पोलिसआयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गि-हे, सहायक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, दत्ता शेळके, सहायक फौजदार नजीर पठाण, जमादार हेमंत सुपेकर, संतोष वाघ, काकडे, उस्मान शेख, वाघचौरे, संजय गावंडे, सुनील जाधव, संतोष बमनावत यांनी केली.