औरंगाबाद : एकाच रात्री दोन खूनाच्या घटनांनी शहर हादरुन गेले. दारु पिण्यावरुन झालेल्या वादानंतर एकाने अवघ्या तीन सेकंदात तरुणाचा भोसकून खून केल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बजरंग चौकातील एका वाईन शॉपवर घडली होती. या घटनेच्या काही तासानंतरच सिडको, एन-2 भागातील प्राध्यापकाची घरातच गाढ झोपेत मध्यरात्री दोनच्या सुमारास गळा चिरुन निर्घुण हत्या करण्यात आली. या लागोपाठ घडलेल्या हत्यांच्या घटनांमुळे शहर हादरुन गेले आहे. मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांच्या संशयास्पद हत्येमुळे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्यासह अख्खे पोलीस दल चक्रावून गेले आहे. विशेष म्हणजे घरात कोणतीही चोरीचा अथवा झटापटीचा प्रकार घडलेला दिसून आलेला नाही. याशिवाय घरात बाहेरुन कोणताही व्यक्ती आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आलेले नाही. त्यामुळे शिंदे यांच्या हत्येच्या संशयाची सुई सध्यातरी कुटुंबियांभोवतीच फिरत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
  मृत प्राध्यापक शिंदे यांच्या पत्नी मनिषा (43) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना चैताली आणि रोहित अशी दोन मुले आहेत. तीन हजार स्क्वेअर फुटच्या दक्षिणमुखी एक मजली बंगल्यामध्ये सहा खोल्या आहेत. त्यात एक बैठक, तीन बेडरुम आणि स्वयंपाक खोली असे आहे. त्यांच्यासोबत सासरे हरिभाऊ शिंदे व सासू चंद्रकला शिंदे असे राहतात. मनिषा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात प्राध्यापिका आहेत. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिंदे कुटुंबियांनी जेवण केले. सासरे हरिभाऊ आणि सासू चंद्रकला हे झोपी गेले. तर मुलांसोबत मनिषा या बैठक खोलीत टिव्ही पाहत होत्या. त्यावेळी पती राजन हे मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास ते बाहेरुन जेवण करुन घरी आले. त्यानंतर ते देखील पत्नीसोबत टिव्ही पाहण्यासाठी बैठक खोलीत गेले. त्यावेळी दोन्ही मुले अभ्यास करत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास मनिषा या झोपण्यासाठी बेडरुममध्ये निघून गेल्या. बेडरुममध्ये जाण्यापुर्वी त्यांनी मुलांना लवकर आवरुन झोपी जा असे सांगितले. मात्र, तोपर्यंत राजन हे अंथरुणावर पडून टिव्ही पाहत होते. सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास मनिषा या झोपेतून उठल्या. तेव्हा मात्र त्यांना शेजारी मुलगी दिसली नाही. तसेच मुलगा रोहित हा देखील बेडरुममध्ये झोपलेला दिसला नाही. त्यामुळे त्यांनी बैठक खोलीत झोपलेले पती राजन यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी राजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना पाहुन मनिषा घाबरून गेल्या. त्यांनी तात्काळ सासू-सासरे यांच्या खोलीत धाव घेत राजन यांच्याविषयी माहिती दिली.

तब्बल साडेचार तासांची चौकशी : शिंदेंच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस आयुक्त गुप्ता यांनी घटनास्थळाची पाहणी करत पोलीस अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता आणि निवृत्त उपअधीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांनी तब्बल साडेचार तास वेगवेगळ्या पध्दतीने शिंदे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चौकशी केली. या चौकशीतून देखील पोलिसांच्या हाती रात्री उशिरापर्यंत काहीही लागले नव्हते. शिंदे हे गाढ झोपेत असताना त्यांच्या दोन्ही हातावर पाय ठेऊन उजव्या हाताने गळा कापण्यात आला. आरडाओरड करु नये म्हणून मारेक-याने दोन्ही हाताच्या नसा कापल्या. याशिवाय डोक्यात हातोड्याने वार करुन कान देखील कापण्यात आल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. या घटनास्थळी उपायुक्त दीपक गि-हे, अपर्णा गिते, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव, मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्यासह गुन्हे शाखेची सर्वच पथके हजर होती.

पुराव्यासाठी पोलिसांची धावाधाव : शिंदेंची हत्या ही घरातील बैठक खोलीत झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घरात बाहेरुन कोणताही व्यक्ति आलेला नाही. घरातील कोणतीही वस्तू तिच्या जागेवरुन दुस-या ठिकाणी हलविण्यात आलेली नाही. असे असताना मारेक-याने पोलिसांच्या हाती लागेल असा एकही पुरावा घटनास्थळी ठेवलेला नाही. पोलिसांनी शिंदे कुटुंबियांच्या मोबाइलची तपासणी केली. त्यातून देखील कोणताही पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी आसपासचा संपुर्ण परिसर अक्षरश: दिवसभर पिंजूण काढला. शेजारच्या घरासह रोहितचा अपघात झालेल्या ठिकाणावरील सीसी टिव्हीची देखील तपासणी केली. त्यातून देखील काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे संशयाची सुई नजीकच्याच व्यक्तिच्या दिशेने असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

आईला न कळवताच रुग्णवाहिकेसाठी घराबाहेर :  नेहमी सकाळी नऊच्या दरम्यान झोपेतून उठणारा मुलगा रोहित हा पहाटे पाचच्या सुमारास शिंदे यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून कोणतीही आरडाओरड न करता अतिशय शांतपणे बहिण चैतालीला सोबत घेऊन रुग्णवाहिका आणण्यासाठी घराबाहेर पडला. कारने (एमएच-20-बीझेड-5001) हे दोघेही भाऊ-बहिण एन-4 मधील एमआयटी हॉस्पीटलकडे निघाले. मात्र, एका सायंदैनिकाच्या कार्यालयाजवळ रोहितच्या कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला (एमएच-20-एफसी-1520) डाव्या बाजूने धडक दिली. हा अपघात घडताच रोहितने तेथेच कार सोडली. त्यानंतर दोघे बहिण-भाऊ पळतच एमआयटी हॉस्पीटलमध्ये गेले. तेथून दोघेही रुग्णवाहिकेने घरी आले. मात्र, रुग्णवाहिका चालकाने शिंदेंचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधावा असे म्हणत जखमी शिंदेंना घेऊन जाण्यास नकार दिला. तोपर्यंत मनिषा यांची कानोकान खबर देखील नव्हती. दरम्यान, रविंद्र अरुणराव देशपांडे यांच्या तक्रारीवरुन रोहितवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चिश्तिया पोलीस चौकी गाठली : एमआयटी हॉस्पीटलमधून घरी आणलेल्या रुग्णवाहिका चालकाने रोहितला शिंदेंना घेऊन जाण्यास नकार दिला होता. तसेच त्याला पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले होते. त्यामुळे रोहितने सिडको, एन-5 मधील चिश्तिया चौकातील पोलीस चौकी गाठली असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. तसेच चौकीत कोणीही दिसून न आल्यामुळे आपण पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आणि शेजारी घरी आल्याचेही रोहितने सांगतो.