औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जवळपास 450 कंत्राटी कामगार मागील वीस वर्षांपासून सेवेत आहेत. असे असताना देखील समान काम समान वेतन सुविधेपासून ते वंचित आहे. योग्य वेतन देण्याची मागणी कामगारांनी केलेली आहे. त्यावर कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पत्र लिहून यावर योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.  
विद्यापीठातील 450 कंत्राटी कामगार सेवेत कायम करण्याचा प्रश्न कायम आहे. कायमस्वरुपी कर्मचार्याप्रमाणे काम करुनही समान काम समान वेतन न देता कामगारांना तुटपुंजे वेतन मिळते आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही न्याय मिळालेला नाही, असा आरोप कामगारांनी केला आहे. कर्मचारी विष्णू लोखंडे, सतीश लोखंडे, दीपक सोळंके, गणेश खांडरे, अजित वर्शिल, संतोष काळे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे औरंगाबाद प्रमुख प्रदीप त्रिभुवन यांच्याकडे कामगारांच्या अडचणीची व्यथा मांडली होती. त्यावर त्रिभूवन यांनी कामगारांची ही व्यथा लक्षात घेऊन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन राज्यमंत्री कडू यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून कामगारांना समान काम समान वेतन मिळण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना केलेली आहे. या कामगारांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत पाठपुरावा करू, असे कडू यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनात तफावत आहे. वेतन तफावत कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन 1970 च्या तरतूदीचा हा भंग असून त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विविध निवाड्याद्वारे समान काम समान वेतन हे तत्व अधोरेखित केले आहे. या न्यायानुसार एकच काम करणार्या कर्मचार्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करायला लावून त्यांचे आर्थिक शोषण थांबविण्याची मागणी पत्रात केली आहे.