पिशोर: येथील पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर अंतरप (56) यांचा औरंगाबाद येथे कोरोना संसर्गाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रामीण भागात कर्तव्यावर असतांना मृत्यू पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नंदकिशोर अंतरप हे पिशोर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. अंतरप यांच्यासह इतर दोघा पोलिस कर्मचार्‍यांना मागील महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. इतर दोन पोलिस कर्मचार्‍यांना सौम्य लक्षणे होती. या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांनी योग्य उपचार घेतले व पूर्ण बरे झाले. परंतु अंतरप यांची लक्षणे सौम्य नसल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि.15) सकाळी त्यांचे निधन झाले. कर्तव्यदक्ष व मनमिळावू पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.