औरंगाबाद (ऋषिकेश श्रीखंडे) :  कोरोना संसर्ग वाढत असतानाच विद्यापीठाच्या पदव्युत्तर वर्गांच्या परीक्षा 27 एप्रिलपासून सुरू होत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले. माञ, पदवी परीक्षेदरम्यान ग्रामीण भागातील महाविद्यालयात झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे पदव्युत्तर परीक्षा तरी ऑफलाइन घेवू नका, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. परीक्षेदरम्यान होणारी विद्यार्थ्यांची गर्दी कोरोना पसरण्यास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती देखील शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर वर्गांच्या परीक्षा 27 एप्रिल 24 मेदरम्यान होणार आहे. या परीक्षेची विद्यापीठाने पूर्ण तयारी केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय खुले करून दिले आहे. पदव्युत्तर वर्गांतील जवळपास 60 टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देण्याचा मार्ग स्विकारतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले आहे. माञ, ऑफलाइन परीक्षेला काही शिक्षक संघटनांनी दबक्या आवाजात विरोध दर्शविला आहे. पदवी परीक्षा देण्यासाठी सर्वांधिक म्हणजे 73 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पर्याय स्विकारला होता. परिणामी, ग्रामीण भागातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीमुळे कोरोना वाढत असताना आणखी संसर्ग पसरण्याची भीती आहे, असे शिक्षक संघटनांनी सांगितले आहे. त्यामुळे, विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइन परीक्षा घ्यावी, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.
 
पदवी परीक्षेतच नियम धाब्यावर : विद्यार्थ्यांनी जीवाची पर्वा न करता परीक्षा दिली. अनेक महाविद्यालयात कोरोना निर्बंधांचे नियम धाब्यावर बसवत खूशाल एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसवल्याचे शिक्षकांनी आदर्श गावकरीला सांगितले. त्यामुळे, आता तरी पदव्यूत्तर परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, असे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देवून देखील विद्यार्थी कोरोना नियमांचे पालन करत नाही, असे शिक्षकांनी सांगितले.

परीक्षेबाबत लॉकडाऊनंतरच निर्णय :राज्यात झपाट्याने वाढणार्‍या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू आहे. जर राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. तर विद्यापीठ पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलायच्या की इतर मार्ग स्वीकारायचा याबाब निर्णय घेईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी आदर्श गावकरीला माहिती देताना सांगितले.