औरंगाबाद : पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय हे आठ दिवसांपूर्वी पालिका अधिकार्‍यांवर कामे सोपवून सुटीवर गेले होते. मात्र ते रजेवरून परतल्यानंतरही संबंधित कामे झालेली नसल्याचे मंगळवारी दि.21 सप्टेंबर रोजी आढावा बैठकीत त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर त्यांनी दहा दिवसात काय काम केले, असा संतप्त सवाल करीत अधिकार्‍यांचा चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांच्या या आक्रमकतेमुळे अधिकार्‍यांची धांदल उडाली. आता पंधरा दिवसांत सर्व कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश पांडेय यांनी अधिकार्‍यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
  औरंगाबाद जिल्हा व शहराच्या विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 9 सप्टेंबर रोजी तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश
 संबंधित विभागाना दिले. त्यानुसार पालिका आयुक्‍त पांडेय यांनी शहरातील  विविध विकासकामांचे सादरीकरण केले. त्यानंतर आठ दिवस ते रजेवर गेले. या आठ दिवसात शहरात करण्यात येणार्‍या विविध कामांचे नियोजन करून अधिकार्‍यांवर त्यांनी जबाबदारी सोपवली. मात्र आयुक्त रजेवर जाताच अधिकारी देखील रिलॅक्स झाले. त्यांनी आयुक्‍त रजेवर असताना पुरेपुर सुटीचा आनंद घेतला. आयुक्तांनी नियोजन करून सोपवलेली कामे करण्याचा विसर त्यांना पडला. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमास आयुक्त पांडेय हे हजर झाले. त्यानंतर दोन दिवस सुटी असल्याने त्यांनी कामाचा आढावा घेतला नाही. मात्र मंगळवारी पालिका कार्यालयात येऊन त्यांनी सर्व अधिकार्‍यांची बैठक बोलावली. या बैठकीत प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांकडील कामांचा आढावा घेत सोपवलेली कामे का पूर्ण केली नाहीत, आठ दिवसात काय काम केले, असे म्हणत पांडेय यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांचा रुद्रावतार पाहून अनेक अधिकार्‍यांची धांदल उडाली.

कामे होत नसतील तर दुसरे अधिकारी मागवतो : आपणाकडून कामे होत नसतील तर तसे सांगा, शासनाला कळवून दुसरे अधिकारी मागवतो, कामाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. 5 ऑक्टोबरपर्यंत सोपविलेली सर्व कामे पूर्ण करा, असे आदेश आयुक्‍त पांडेय यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.