औरंगाबाद : केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत औरंगाबाद शहरातील पथविक्रेत्यांना महापालिका स्तरावरून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सर्व बँक व्यवस्थापकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासन निर्णयाबाबत पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना मनपा हद्दीत प्रभावीपणे राबविण्याचे निश्‍चित झाले असून त्यानुसार बँकांना पालिकेने सूचना केल्या आहेत.
पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. कर्ज पुरवठा करणार्‍या बँकांनी सामाजिक बांधिलकीने पथविक्रेत्यांच्या ऑनलाईन कर्ज मागणी अर्जावर लवकर कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे बँकांनी शासन निर्णयाचा आधार घेऊन कर्ज प्रकरणाचा निपटारा तात्काळ करावा, प्रत्येक पथविक्रेत्याला योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आदेश आयुक्‍तांनी दिले. या बैठकीत पथविक्रेता सर्वेक्षण व त्यासंबंधीच्या आराखडावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतून काही आवश्यक सूचनाही आयुक्‍तांनी बँकांना केल्या. या योजनेचे उद्दिष्ट प्रत्येक पथविक्रेत्यास 10 हजार रूपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे आहे. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी www.pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.


अर्ज भरताना अशी घ्या काळजी : अर्ज करण्यास लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक झालेले असावे. बँक खात्याची सविस्तर माहिती भरून द्यावी. 1 फोटो व आधारकार्ड अपलोड करावे. महा-ई-सेवा केंद्राद्वारे लाभार्थी आपला अर्ज ऑनलाईन भरू शकतात. योजनेसाठी 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी शहरामध्ये पथविक्री करीत असलेले सर्व पथविक्रेते पात्र ठरतील. यामध्ये शहरातील पथविक्रेते लगतच्या ग्रामीण शहरात व्यवसाय करणारे आणि कोरोनामुळे त्यांच्या गावी गेलेले पथ विक्रेते यांचा समावेश असेल. पथ विक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास 7 टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील.