औरंगाबाद : तिजोरीत खडखडाट असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून शहरातील वॉडांतर्गत विकासकामे ठप्प आहेत. त्यामुळे आता अत्यावश्यक कामे करण्यासाठी महापालिकेने तब्बल 300 कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या हालचाली देखील प्रशासनाने सुरू केल्या आहेत. कर्जासाठी पालिका चार बँकांकडे विचारणा करत चाचपणी करत आहे. बँकांनी देखील पालिकेला पत विचारली असून किती मालमत्ता तारण ठेऊ शकते, याविषयीची माहिती मागवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालिकेने काही वर्षांपूर्वी बँकांकडून कर्ज काढले होते. त्याचा वेळेत भरणा देखील केला. त्यामुळे मध्यंतरी एका राष्ट्रीय संस्थेने पालिकेचे क्रेडिट रेटिंग करुन बी ट्रिपल प्लस ग्रेड दिला. या ग्रेडमुळे पालिकेची पत वाढली आहे. पत वाढल्यामुळे कर्ज काढणे सोपे जाईल, असेही वरिष्ठ अधिकार्‍यांनी पालिकेकडे स्पष्ट केले आहे. एखाद्या महत्वाच्या प्रकल्पासाठी गरज पडली तर कर्ज काढले जाईल, असे देखील पालिकेने संबंधितांना कळवले होते. त्यानुसार आता पालिकेने कर्ज काढण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे कळते आहे. शहरात विविध मुलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाने 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची प्रक्रिया मागील महिन्यापासून हाती घेतली आहे. यासाठी चार बँकांशी चर्चा देखील केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सेंट्रल बँक, एचडीएफसी बँक, महाराष्ट्र बँक आणि कॅनरा बँक या बँकांचा समावेश आहे. तिनशे कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल का, व्याजाचा दर काय असेल, याबद्दल लेखा विभागांची बँकांशी बोलणी सुरू आहे. बँक व्यवस्थापनाने देखील पालिकेचे क्रेडिट किती आहे, कर्ज घेतले तर पालिका बँकेकडे तारण काय ठेवणार आहे, याची माहिती मागीतली आहे. त्याशिवाय बॅलेन्स शिटची मागणी देखील बँकांनी प्रशासनाकडे केली आहे. 

यापूर्वी मनपाने फेडले 200 कोटींचे कर्ज : औरंगाबाद पालिकेने थकीत वीज बिल भरण्यासाठी सात ते आठ वर्षांपूर्वी 200 कोटींचे कर्ज बँकेकडून घेतले होते. या कर्जासाठी 23 मालमत्ता त्यावेळी तारण ठेवल्या होत्या. अलीकडे कोरोनाकाळात विकासकामांना ब्रेक लागला. यामुळे पालिकेने शिल्लक राहिलेल्या पैशातून हे कर्ज फेडले. 23 पैकी 14 मालमत्ता संबंधित बँकेने पालिकेच्या नावे देखील केल्या. आता उर्वरित मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.