औरंगाबाद : महापालिकेने यापूर्वी तयार केलेली प्रभागरचना व आरक्षण सोडतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जैसे थेचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार औरंगाबाद पालिकेचा प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात अडथळा आहे, पालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पत्राद्वारे कळविले आहे, अशी माहिती उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सोमवारी दि.11 ऑक्टोबर रोजी दिली.
  राज्य सरकारने औरंगाबादसह राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणूका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोगाने हालचाली सुरू केल्या. पाच ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनाला प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. दरम्यान पालिका निवडणुकीसाठी यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण सोडत व वॉर्डरचनेबाबत आक्षेप घेत 
माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह इतरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यात न्यायालयाने जैसे थेचे आदेश दिले आहेत. असे असताना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागरचनेची प्रक्रिया सुरू करणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होइल, अशी नोटीस याचिकाकर्त्यांनी वकिलामार्फत आयोगाला बजावली आहे. पालिकेने देखील कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती तयार करण्याची तयारी केली होती. मात्र उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले की, आयोगाने कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र औरंगाबाद पालिकेविषयी सुप्रीम कोर्टाने जैसे थेचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ही माहिती निवडणूक आयोगाला पत्राद्वरे कळवली आहे. आयोगाच्या पुढील आदेशानंतरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिनाभर मतदार याद्यांची पुनर्रचना : पालिकेने तूर्तास प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम बाजूला ठेवले आहे. मात्र तरीही शासन निर्देशांनुसार 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. महसूल विभागाने मदत मागितली तर पालिकेचे प्रभाग कार्यालये नागरी सुविधा केंद्र म्हणून वापरले जातील, असेही उपायुक्‍त टेंगळे यांनी नमूद केले.

आता जानेवारी 2022 पर्यंतच्या याद्यांवर काम : आगामी पालिका निवडणूकीसाठी 1 जानेवारी 2022 पर्यंतची मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. त्याअनुशंगाने मुख्य निवडणूक अधिकार्‍याने सूचना केल्या असल्याचे देखील टेंगळे यांनी माहिती देताना स्पष्ट केले.