हर्सूल (उद्धव भा. काकडे, प्रदिप जगताप) : मागील पाच वर्षे महापालिकेत सेना-भाजप युतीची सत्ता असताना सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील हर्सूल ते पिसादेवी रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा प्रश्‍न मांडला होता. 
शासन निधीच्या यादीत समावेश करून या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे, अशी मागणी वेळोवेळी केली गेली. मात्र पालिकेतील धोरणी पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या राजकीय खेळीत आजवर हर्सूलकरांचा आवाज दाबला गेला. 
परिणामी, आता पालिकेत प्रशासकीय राज सुरू असताना या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे साकडे घालण्याची वेळ ओढावली आहे. मात्र यानंतरही हा प्रश्‍न सुटेल की नाही, याबाबत शंका आहे.
भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांची नुकतीच केंद्रीय अर्थराज्य मंत्रीपदी निवड झाली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच औरंगाबादेत येताच डॉ. कराड यांच्याकडे नागरिकांनी विविध समस्यांच्या निवेदनांचा अक्षरशः पाउस पडला. यातच हर्सूल ग्रामस्थांच्या वतीनेही आयोजित सत्कार 
सोहळ्यात हर्सूल-पिसादेवी रस्त्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांसंबंधी त्यांना निवेदन देण्यात आले. 
हर्सूलचा पालिकेत समावेश होवून अनेक वर्षे झाली, मात्र अद्यापही पालिकेच्या विविध मुलभूत सेवा हर्सूल ग्रामस्थांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. आजघडीला हर्सूल ते पिसादेवी, जमनज्योती, चेतनगर रोड या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मात्र या प्रश्‍नांकडे पालिका प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. या प्रमुख रस्त्यांच्या कामासह हर्सूल परिसरातील नागरिकांचे अनेक प्रश्‍न आजवर प्रलंबित आहेत. त्यात हर्सूल ते पिसादेवी रोडची अवस्था तर खूप जीवघेणी झालेली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यांच्या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देत त्याचे काम लवकर हाती घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी नागरिकांनी केली. त्यावर लवकरात लवकर हर्सूल ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील. प्रामुख्याने हर्सूल ते पिसादेवी रस्त्यासाठी पाठपुरावा करून भरीव निधी मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवकपुनमचंद बमणे, राजु तुपे, सांडू औताडे, दादासाहेब औताडे, माधव वाणी, साईनाथ हरणे, मनोज जाधव, कचरू पांढरे, प्रेमनाथ चव्हाण, जेहुर पटेल, बाबासाहेब नलावडे, बाळासाहेब औताडे आदींची उपस्थिती होती.

जलील, जैस्वाल, बागडे नावापुरतेच लोकप्रतिनिधी : मागील सात वर्षांत हर्सूल-पिसादेवी रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा किंवा पालिकेला रस्त्याचे काम करण्यास सांगावे, अशी विनंती दै. आदर्श गावकरीसह येथील नागरिकांनी सुरूवातीला तत्कालीन आमदार व सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडेही वारंवार केली. यानंतर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रदीप जैस्वाल पुन्हा विक्रमी मतांनी विजयी झाले. यात हर्सूल परिसरातील नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनाही या रस्त्याच्या कामाबद्दल गळ घालण्यात आली. मात्र आजवर या दोन्हीही लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दयनीय अवस्थेची साधी पाहणीही केलेली नाही. शिवाय हरिभाउ बागडे नानांच्या फुलंब्री मतदारसंघाचा हा रस्ता एक भाग आहे. त्यांच्याकडेही या रस्त्याच्या कामासाठी मागणी केली केली. याप्रश्‍नी त्यांनी प्रशासनाला मध्यंतरी सूचना केली होती. मात्र त्यांच्या सूचनेचाही प्रशासन आजवर अनादर करते आहे.  

आयुक्‍तांची गाडी अजूनही फिरकेनाच : हर्सूल-पिसादेवी रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेची पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यापूर्वी पालिकेच्या एका शिष्टमंडळाने केली होती.  या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की आयुक्‍त पांडेय यांनी स्वतः या रस्त्याने दुचाकी चालवून दाखवावी, असे खुले आव्हान दै. आदर्श गावकरीने केले होते. मात्र अजूनही पांडेय यांची गाडी या रस्त्यावर आलेलीच नाही. 

शासन निधीच्या दोन्हीही याद्यांत डावलले : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केशवराव औताडे यांनी स्वतः त्यावेळी तत्कालीन आयुक्‍त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रत्यक्ष भेट घेवून या रस्त्याचे काम करण्याची विनंती केली होती. त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी 152 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र या यादीत जाणीवपूर्वक राजकारण्यांनी या रस्त्याला स्थान मिळवून दिले नाही. तत्पूर्वी, शंभर कोटींच्या निधीच्या रस्त्यांच्या यादीतही या रस्त्याला बाजूला टाकण्यात आले. तरीही येथील नगरसेवक आजवर गप्प आहेत.