औरंगाबाद : महापालिकेच्या शाळांमध्ये शुक्रवारी दि.16 असुदे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नॉर्थ स्टार या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी पालिकेच्या चार प्रमुख शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आणि व्यवसाय मार्गदर्शनासाठी या उपक्रमांची मदत होणार आहे. यात जगभरातील चार देशांमधील प्रमुख मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. हा उपक्रम राज्यात सर्वप्रथम औरंगाबादेत राबवला जात आहे, हे विशेष.
या उपक्रमाचा शुभारंभ पालिका आयुक्‍त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या दालनात औपचारिकरित्या करण्यात आला. यावेळी असुदे फाउंडेशनचे संचालक व्यंकटेश खारगे, अलेरिया मंतेरो, पंकज तांदूळकर, रत्नप्रभा बहाळकर, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व शशिकांत उबाळे यांची उपस्थिती होती. असुदे फाउंडेशनचे व्यंकटेश खारगे यांनी पालिकेअंतर्गत चार शाळांमध्ये राबवल्या जाणार्‍या या उपक्रमाची माहिती पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे यावेळी दिली. या उपक्रमासाठी नॉर्थ स्टार शोधत असताना ज्याप्रमाणे ध्रुवतारा सर्व तार्‍यामध्ये प्रखर असतो, तो सर्वांना मार्ग दाखवतो इतरांना प्रकाश देतो. अगदी त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी निवडण्यात येणार्‍या मार्गदर्शकांना नॉर्थ स्टार संबोधले जाते. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोगी आहे, त्याचे महत्त्व, त्याचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून खारगे यांनी सांगितले. हा उपक्रम प्रारंभी प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी, प्राथमिक विद्यालय चिकलठाणा, प्राथमिक विद्यालय हर्सूल, प्राथमिक विद्यालय मिटमिटा येथे राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने पालिकेच्या सर्व शाळांत तो राबविण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खारगे यांनी दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांकडून मिळणारी माहिती नक्कीच उपयोगी पडेल, अशी भावना आयुक्‍त पांडेय यांनी यावेळी व्यक्‍त केली. तसेच पालिकेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व पालिका प्रशासन या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.