औरंगाबाद / प्रतिनिधी,


शहराच्या 1680 कोटींच्या नवीन जलयोजनेच्या कामाचाही प्रवास संथ गतीने चालू आहे. यासंबंधीची संचिका आता टेंडर कमिटीच्या माध्यमातून पाठवण्याची सूचना राज्य सरकारने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला केली आहे. सरकारचा ही सूचना म्हणजे वरातीमागून घोडे असाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे. टेंडर कमिटीचे अध्यक्ष पाणी पुरवठा मंत्री असतात, आता त्यांच्या मान्यतेनंतर जलयोजनेची संचिका नगरविकास खात्याकडे पुन्हा पाठवली जाईल.
तब्बल 1680 कोटींची नवीन जलयोजना औरंगाबाद शहरासाठी तयार करण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून या योजनेच्या मान्यतेचा प्रश्‍न कायम आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या जलयोजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून प्राप्त झालेली निविदा स्वीकारायची की फेटाळायची एवढाच विषय आता बाकी आहे. त्यासाठी मागील काही महिन्यांपासून निविदेच्या संचिकेचा प्रवास संथगतीने सुरु आहे. नगरविकास विभागातून वित्त विभागात आणि वित्त विभागातून नगरविकास विभागात या संचिकेचा प्रवास आजवर सुरु होता. सुत्रांच्या माहितीनुसार जलयोजनेची संचिका राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरणाच्या टेंडर कमिटीच्या माध्यमातून पाठवा, असा अभिप्राय लिहून नगरविकास खात्याने ही संचिका पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठवली आहे. त्यामुळे ही संचिका आता टेंडर कमिटीसमोर ठेवली जाईल. पाणी पुरवठा विभागाचे मंत्री या कमिटीचे अध्यक्ष असून त्यांच्या मान्यतेनंतर ती संचिका पुन्हा एकदा नगरविकास खात्याला पाठवली जाईल. विशेष म्हणजे आता या प्रक्रियेला पुन्हा वेळ जाणार आहे, असे माहिती देताना सूत्रांनी स्पष्ट केले.