औरंगाबाद : बेकायदेशीरपणे होणारी पाण्याच्या विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहे. त्यानुसार राज्य सरकारने सर्व महापालिका, नगरपालिकांकडून पाण्याचे जार विक्रीच्या व्यवसायाची माहिती मागवली आहे. माहिती एकत्रित झाल्यावर राज्य सरकार याप्रकरणी निर्णय घेणार आहे. राज्य सरकारच्या नगरपालिका संचालनालयाचे याबद्दलचे पत्र औंरगाबाद महापालिकेलाही पाठवले आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन देखील माहिती संकलित करण्याच्या कामाला लागले आहे.

राज्यातील विविध शहरांत बेकायदेशीरपणे थंड पाणी जारद्वारे विकले जात आहे. या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्‍नचिन्ह असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. बेकायदेशीरपणे होणारी पाण्याची ही विक्री बंद करावी, अशी विनंती करणारी याचिका विजय दुबलवाडीकर यांनी हरित लवादासमोर केली होती. या याचिकेची दखल घेऊन हरित लवादाने राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे व उचित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हरित लवादाच्या या आदेशाच्या अनुशंगाने राज्य सरकारच्या नगरपालिका संचालनालयाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांच्या नावे लेखी आदेश काढले आहेत. त्या त्या पालिका व नगरपालिका क्षेत्रात पाण्याचे जार विक्रीच्या व्यवसायाबद्दल माहिती संकलित करुन ती तातडीने सादर करण्याचे या आदेशात म्हटले आहे. राज्यभरातून प्राप्त होणार्‍या या माहितीच्या आधारे राज्य सरकार पाण्याच्या जार विक्रीच्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याची शक्यता आहे, त्याची माहिती हरित लवादाला देखील सादर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.