औरंगाबादः

घराच्या पत्त्यावर बँकेकडून आलेले एटीएम कार्ड परस्पर लांबवले. त्यानंतर स्वत: चा मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करुन एमआयडीसीतील एका कंपनीच्या वाहनावरील चालकाला ओळखीच्याच भामट्याने सव्वालाखाला गंडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मार्च ते एप्रिल २०२० या काळात छावणीतील शांतीपुरा भागात घडला. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली जमापुंजीच भामट्याने लांबवल्याने चालकाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
एमआयडीसीतील एका कंपनीच्या वाहनावर चालक असलेले दिलीप फिलीप साठे (६१, रा. शांतीपुरा, छावणी) यांनी वाळुज औद्योगिक वसाहतीतील एसबीआयच्या शाखेत खाते उघडले. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी एक लाख १९ हजार पाचशे रुपये एफडी केले. जुने एटीएम कार्ड खराब झाल्याने त्यांनी नवीन कार्डसाठी बँकेकडे अर्ज केला. त्यानुसार, बँकेने ५ जानेवारी २०१८ मध्ये त्यांच्या घराच्या पत्त्यावर नवीन एटीएम कार्ड पोस्टाने पाठवले. हे एटीएम कार्ड साठे यांच्याकडे न पोहाचते करता भामट्याने स्वत: स्विकारले. त्यानंतर त्याने एटीएम कार्ड व त्याचा गोपनीय क्रमांक स्वत: जवळच ठेवला. दरम्यानच्या काळात त्याने एटीएम सेंटरमध्ये जाऊन स्वत:चा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न केला. त्यामुळे बँकेशी साठे यांनी केलेले सर्व व्यवहार जमा ठेव याची माहिती भामट्याला मोबाईलवरील मॅसेजव्दारे प्राप्त झाली. पुढे त्याने टप्प्याटप्प्याने साठे यांच्या खात्यातून रक्कम काढायला सुरूवात केली.


मुलीच्या लग्नाची होतीः
मोबाईलमधील अॅापच्या सहाय्याने भामट्याने साठे यांनी मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली एफडी मोडली. मात्र, एफडीची रक्कम बचत खात्यात दिसत नसल्याने रक्कम गायब झाल्याचे साठेंच्या लक्षात आले नाही. नुकतेच ३ सप्टेंबर रोजी साठे बँकेत गेले. त्यावेळी त्यांनी एफडी मोडण्यासाठी बँकेकडे अर्ज केला. तेव्हा त्यांच्या खात्यातील संपुर्ण रक्कम भामट्याने लांबवल्याचे समोर आले. त्यामुळे जबर मानसिक धक्का बसल्यानंतर साठे यांनी अखेर रविवारी छावणी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.