औरंगाबादः

कुत्र्याला दगड फेकून मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलाला चाकुने भोसकल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास शहानुरमिया दर्गा परिसरातील जाबींदा इस्टेट समोर घडली़ चाकू हल्ला करणारे दोघेही अल्पवयीन असून, उस्मानपुरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांनी दिली.


जाबिंदा इस्टेट परिसरात १३ आणि १४ वर्षीय अल्पवयीन भाजीपाल्याची हातगाडी घेऊन फिरत होते़ या वेळी प्लॉट क्रमांक ४ मधील घरासमोर एका मुलाने भाजी विक्रीसाठी आवाज दिला. त्याच्या अंगावर पाळीव कुत्रा भुंकल्याने दोघांनी त्याला दगड मारुन हाकलले. तेव्हा घराबाहेर आलेल्या बारा वर्षीय मुलाने आमच्या कुत्र्याला दगड का मारला ? असा जबा विचारताच भाजी विक्रेत्या मुलांनी हातगाडीवरील चाकु त्याच्या पोटात भोसकला. अचानक झालेल्या या हल्ल्यात बारा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत त्याने आरडा-ओरड करताच हल्लेखोर अल्पवयीन घटनास्थळावर भाजीचा गाडा सोडून पसार झाले़
या घटनेची माहिती जाबिंदा इस्टेट परिसरातील नागरिकांनी तात्काळ उस्मानपुरा पोलिसांना दिली़ त्यानंतर जखमी बालकाला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून पसार झालेल्या अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेऊन हातगाडी व चपला जप्त केल्या़
बालकाची प्रकृती चिंताजनकः
जखमी बालकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार उपेंद्र कत्तूल यांनी रुग्णालयात नातेवाईकांचा जवाब नोंदविला आहे़.