खुलताबाद : तालुक्यातील दरेगाव येथे दोन गटांत शनिवारी (दि.27) वाद झाला. या प्रकरणी दोन्ही गटाच्या फिर्यादीने  दिलेल्या परस्पर तक्रारीवरून दोन्ही गटांतील 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेगाव येथे दोन गुंठे जागेवरून दोन गटांत वाद सुरू झाला. त्यातील एका गटातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी (दि.27) सकाळी 5 वाजेच्या सुमारास दरेगाव येथील योगेश बनकर यांनी व इतर सहा जणांनी घरात घुसून मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. यावरून योगेशसह सात जणांविरूद्ध विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
एका गटातील 7 जणांवर विनयभंग व मारहाणीचा तर दुसर्‍या गटातील 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा व अल्पवयीन मुलीला छेडछाड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे दोन्ही गटातील एकूण 11 जणांवर गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्‍या गटातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दरेगाव येथील विलास गायकवाड यांनी अल्पवयीन मुलीची छेडछाड काढली व जातीवाचक शिवीगाळ केली त्यावरून विलास गायकवाडसह चार जणांवर छेडछाड व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे तपास करीत आहे.