औरंगाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज मराठवाडा दौऱ्यावर आले होते. मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाची त्यांनी पाहणी केली. फुलंब्री, खुलताबाद, औरंगाबाद, कन्नड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

प्रवीण दरेकर म्हणाले, 'मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, त्याच बरोबर बागायती जमिनीसाठी ५० हजार आणि कोरडवाहू जमिनीसाठी २५ हजार हेक्टरी मदत जाहीर करा. मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी चिंतेत असून त्यांची परिस्थिती गंभीर आहे. परंतु या सरकारचे शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे मुळीच लक्ष नाही. शासनाची पूर्ण ताकद वापरून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. तसेच पीक विम्याचे क्लेम त्वरित मंजूर करा. जर या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर भाजप शेतकऱ्यांना घेऊन संघर्ष करेल.'

'शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. हे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घेत नाहीये. सरकार केवळ पत्रव्यवहार करत आहे.' अशीही टीका दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.