पैठण : अतिवृष्टीमुळे शेता नजीक असलेल्या नदीत वाहून आलेली वाळू उपसा करून  वाहतूक करण्यासाठी दरमहा एक लाख तीस हजार रुपये लाचेची मागणी करणारे  पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचा खाजगी दलाल नारायण वाघ यांच्याविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पैठण पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पैठण तहसीलमध्ये दोन वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदार महेश सावंत यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर बरोबर दोन वर्षानंतर तहसीलदारदार शेळके यांच्यावर  झालेल्या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा शेती व  वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांचे भागीदारीत असणार्‍या शेतात अतिवृष्टीमुळे नदीतील वाळूचा साठा झाला आहे. सदर वाळूचा उपसा करून व दोन हायवा वाहनाद्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी आरोपी तहसीलदार चंद्रकांत शेळके व खाजगी इसम नारायण वाघ यांनी पंच साक्षीदार समक्ष एक लाख तीस हजार रुपये मासिक हप्त्यााची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी त्यांच्या शासकीय  चेंबर मध्ये भेट झाली असता तहसीलदार शेळके यांनी प्रत्यक्ष पंचांसमक्ष तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्याबद्दल बोलणी करून आरोपी खाजगी दलाल नारायण वाघ यांच्याकडे लाच देण्यासंबंधी सूचना केली. नारायण वाघ यांनी केलेल्या लाच मागणीचे समर्थन करून लाच घेण्यासाठी तहसीलदार शेळके यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर पुन्हा आरोपी वाघ याने तहसीलदार शेळके यांच्या चेंबर बाहेर येऊन पंच साक्षीदार समक्ष एक लाख तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. यानुसार लाचलुचपत विभागाचे अधिक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उप अधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, उपअधीक्षक मारुती पंडीत, पो. नि. संदीप राजपूत, पोलीस हवालदार गंगाधर भताने, राजेंद्र जोशी, पोलीस नाईक, भूषण देसाई, पो. जमादार चांगदेव बागुल यांनी ही कारवाई केली.