औरंगाबाद : विना परवाना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या हॉटेल चालकांविरुध्द पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी बीड बायपास, जाधववाडी आणि चिकलठाणा एमआयडीसीतील हॉटेलवर छापा मारुन देशी-विदेशी दारु जप्त केली. तसेच हॉटेल मालक व ग्राहकांविरुध्द संबंधीत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड बायपास रोडवरील हॉटेलवर छापा मारुन गुन्हे शाखा पोलिसांनी मालकासह सात जणांना पकडले. ही कारवाई 20 नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास करण्यात आली. बीड बायपास रोडवरील शिवानी हॉटेलमध्ये ग्राहकांना विनापरवाना दारु पिण्यासाठी जागा दिली जात असल्याचीमाहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांनी पथकासह छापा मारुन हॉटेल मालक मंगेश नामदेव चाटे (रा. संग्रामनगर, सातारा परिसर), ग्राहक संदीप वसंतराव चाबुकस्वार (रा. हायकोर्ट कॉलनी), बंडू रावण सोलाट (रा. पिंपळवाडी, ता. पैठण), गौरव सुरेश गाजरे (रा. अजबनगर), अजय रमेश जाधव (रा. बापुनगर, खोकडपुरा), रत्नदीप नामदेव वाहुळे (रा. कबीरनगर, उस्मानपुरा) आणि किरण विनायक कोल्हे (रा. तीसगाव, म्हाडा कॉलनी) यांना पकडले. त्यांच्याकडून 670 रुपयांची दारु जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिस नाईक माधव चौरे यांच्या तक्रारीवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधववाडीत देशी दारू जप्त : 21 नोव्हेंबर रोजी जाधववाडीतील नवा मोंढा भागात असलेल्या समाधान हॉटेलवर छापा मारुन गुन्हे शाखा पोलिसांनी हॉटेल मालक दिनकर विश्वनाथ थोरात (43, रा. सुरेवाडी, जाधववाडी) याला देशी दारुची विक्री करताना पकडले. त्याच्याकडून दोन हजार 820 रुपयांची दारु जप्त केली. त्याच्याविरुध्द गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संजयसिंह राजपूत यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिकलठाण्यातही पथकाची कारवाई : चिकलठाणा एमआयडीसीतील हॉटेल शुभमवर छापा मारुन 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पोलिसांनी हॉटेल मालक संदीप गणेश गोटे याच्यासह ग्राहक रवि सोमीनाथ कावडे, अशोक भिमराव शिंदे, अनिल लक्ष्मण मोनेमाणिक, काकासाहेब भाऊसाहेब कुबेर, अंकुश रामकिसन आगळे, गणेश मनोहर नवपुते यांना पकडले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.