औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठवी ते दहावी, अकरावी, बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. मात्र शाळेत जाण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार शहरात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या सुमारे साडेतीन हजार चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी बुधवारी दि.18 दिली.
राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना संसर्गामुळे मागील महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. मात्र आता कोरोनाचा वाढता संसर्ग कमी होताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. परिणामी, राज्य सरकारने आता मिशन बिगेन-अगेनअंतर्गत लॉकडाऊनमधून सूट देत टप्प्या-टप्याने बाजारपेठा खुल्या केल्या. नुकतेच मंदिरेही सुरू केली आहेत. त्यामुळे आता इयत्ता 8 वी ते 10 वी आणि 11, 12 वीचे वर्ग सोमवार दि.23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शाळा उघडण्यापूर्वी खबरदारी म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद पालिकेने शहरातील सर्वच 16 कोरोना चाचणी केंद्रावर अतिरिक्त चाचणी कीट पाठविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवार दि.17 पासूनच केंद्रावरील कर्मचार्‍यांना तशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली.

प्रत्येकाला देणार प्रमाणपत्र : शहरात शिक्षक, शिक्षकेतर असे सुमारे साडेतीन हजार कर्मचार्‍यांच्या कोरोना चाचण्या करणे गरजेचे आहे, असे शिक्षण विभागाने पालिकेला कळविले आहे. त्यानुसार पालिकेने आरटीपीसीआर पद्धतीच्या या चाचण्या करण्याचे नियोजन केले आहे. सोमवारपर्यंत चाचण्या पूर्ण केल्या जातील. तसेच प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल, असेही डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले. या काळात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी चाचण्या करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

चाचणीसाठी जा या केंद्रांवर : समाजकल्याण हॉस्टेल किलेअर्क, एमजीएम स्पोर्ट कॉम्पलेक्स, सिपेट चिकलठाणा, एमआयटी हॉस्टेल, बीड बायपास, अग्निशमन केंद्राची इमारत पदमपूरा ही केंद्रे चोवीस तास सुरू आहेत. तसेच पालिका आरोग्य केंद्र एन-11, आरोग्य केंद्र राजनगर, सिडको एन-2 कम्युनिटी सेंटर, बायजीपूरा आरोग्य केंद्र, तापडिया मैदान, अदालत रोड, रिलायन्स मॉल गारखेडा, हर्षनगर, चिकलठाणा, सिडको एन-8 आणि शिवाजीनगर आरोग्य केंद्र व छावणी परिषद रुग्णालय या केंद्रांवर सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कोरोना चाचण्या केल्या जातील.