औरंगाबाद / प्रतिनिधी,


शहरातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींना शोध घेणारी टास्क फ ोर्स महापालिकेने आता जवळपास बंद केली आहे. दुसरीकडे कोरोना रूग्ण आढळलेला परिसर सील करणेही थांबवले आहे. त्याऐवजी आता ऐच्छिक कोरोना चाचण्यांवर पालिकेने अधिकचा भर दिला असून त्यासाठी शहरात 25 ठिकाणी अ‍ॅन्टिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध केली आहे.
कोरोना संसर्गाच्या सुरूवातीच्या काळात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच त्याच्या घराभोवतालचा परिसर पत्रे लावून सील केला जात असे. संबंधित परिसरात पुढील चौदा दिवस आरोग्य कर्मचार्‍यांकडून नियमित आरोग्य तपासणी केली जायची. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या कोरोना तपासण्या करणे, पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागात औषध फवारणी करणे आदी उपाययोजना पालिकेकडे सुरूवातीला राविल्या जात होत्या. पुढे एप्रिल आणि मे महिन्यात शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे पालिकेने संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांच्या तपासण्या करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केले. पालिकेच्या विधी अधिकारी अपर्णा थेटे यांची या टास्क फोर्सच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. तसेच त्यांना सहकार्य करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांचीही नियुक्ती केली होती. थेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन महिने मिशन मोडवर काम करत जास्तीत जास्त संशयित व्यक्तींना शोधून क्वारंटाईन केले. त्यामुळे मध्यंतरी क्वारंटाईन केंद्र गर्दीने फुल्ल झाले होते. मात्र, आता कोरोना उपाययोजनांमध्ये पालिकेकडूनच ढिल दिली जात असल्याचे समोर आले आहे. आता पालिलकेने टास्क फोर्सचे काम जवळपास थांबवले आहे. संपर्कातील व्यक्तींना शोधण्याऐजवी ऐच्छिक चाचण्या करुन घेण्यावरच पालिकेने भर दिला आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी अ‍ॅन्टीजेन टेस्टचे कॅम्प सुरू केले आहेत. तिथेच लोकांना स्वत: येण्याचे आवाहन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.


संसर्ग वाढण्याचा धोका...
मागील काही दिवसांपासून पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराभोवतालचा परिसर सील करणेही बंद केले आहे. पूर्वी एक रुग्ण आढळला तरी तिथे पत्रे लावून परिसर सील केला जात असे. आता महिनाभरापासून यात बदल केला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणी पत्रे लावले जात नसल्याने त्याविषयी कुणालाही माहिती होत नसल्याचे आणि त्यामुळे परिसरातील लोक गाफील राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.


गरजेनुसार संपर्कातल्यांचा शोध...
टास्क फोर्स पथकातील कर्मचारी आमच्याकडेच आहेत. ते आम्हाला बुथ मॅनेजमेंट आणि इतर कामांमध्ये सहकार्य करत आहेत. तसेच गरजेनुसार संपर्कातील व्यक्तींचा शोधही घेतला जात आहे. मात्र आता लोक स्वत:हूनच तपासणीसाठी येत आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाबत नियम बदलले आहेत. मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले तरच पत्रे लावली जात आहेत. कमी रूग्ण असलेल्या ठिकाणी सतर्कतेसाठी बॅनर लावले जात आहेत.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.