औरंगाबाद : 31 डिसेंबर 2007 पर्यंत संगणक अहर्ता धारण न करणार्‍या शिक्षक, कर्मचार्‍यांच्या वार्षिक वेतनवाढी बंद करून वसुली करण्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 नोव्हेंबरला आदेश काढले होते. या आदेशावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना हे शासनादेश स्थगित करण्याची मागणी केली होती. आता आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी इस्लामपूर (सांगली) येथे भेट घेऊन संगणक अहर्तेच्या संबंधाने निर्माण झालेल्या अडचणी लक्षात आणून दिल्या होत्या. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालत 26 नोव्हेंबरच्या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश निर्गमित केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी दिली आहे. अवघ्या चोवीस तासात काढलेल्या आदेशाबद्दल समितीने राज्य सरकारचे आभार मानले आहेत. शिष्टमंडळात उदय शिंदे, विश्वनाथ मिरजकर, विनय कोंबे, सयाजी पाटील, विजय साळकर, रंजित राठोड, नितीन नवले, बाबा लाड, मनोज पाटील, रमेश पाटील, वजीर मुल्ला आदी सहभागी होते.