औरंगाबाद : पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने नोडल अधिकार्‍यांनी निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नोडल अधिकार्‍यांची आढावा बैठक चव्हाण यांनी शुक्रवारी दि.20 घेतली.

तत्पूर्वी पोलिस बंदोबस्त नियोजनाबाबतही त्यांनी माहिती घेतली. यावेळी पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक(ग्रामीण) मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.भारत कदम आदींसह सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती. चव्हाण यांनी निवडणूक काळात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या. निखिल गुप्ता आणि मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे सांगितले.

आचारसंहितेत अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण , कायदा व सुव्यवस्था सुरक्षा व जिल्हा सुरक्षा नियोजन, मतदान कर्मचारी, व्यवस्थापन, उमेदवार राजकीय पक्ष यांचे निवडणूक संबंधित खर्च व त्यावर नियंत्रण, मिडिया कक्ष, जंबो बॅलेट बॉक्स, मतपत्रिका छपाई व वितरीत टपाली मतपत्रिका, निवडणूक साहित्य मागणी, वितरण, वाहन व्यवस्था, संगणक कक्ष, स्वीप कार्यक्रम, मतदारांना सुविधा स्ट्राँग रुम, मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा, तयारी, मतदार यादी वितरण, मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा, भोजनव्यवस्था, मतदान आकडेवारी संकलन, वेबकास्टिंग यासंबंधित कक्षप्रमुखांनी वेळेत, चोख कार्यवाही पार पाडण्याच्या सूचना चव्हाण यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. गव्हाणे यांनीही निवडणूक सुरळीत , पारदर्शक स्वरुपात पार पाडण्यासाठी करावयाच्या कार्यवाही बाबत नोडल अधिकारींना मार्गदर्शन केले.