औरंगाबाद - बाहेरगावी कुटुंबियांसह गेलेल्या तरुणाचे घर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास भावसिंगपुरा, भीमनगर भागात घडला. मात्र, हा प्रकार गुरुवारी रात्री घरी परतलेल्या कुटुंबियांना शेजा-यांनी सांगितला. या घटनेत दरवाजांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा प्रयत्न फसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

सध्या दिवाळसणामुळे बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांची रेकी करुन चोरटे रोख, दागिने तसेच मिळेल ते लांबवत आहेत. भीमनगरातील राकेश नारायण कांबळे 12 नोव्हेंबर रोजी कुटुंबियांसह लातूरला गेले होते. दिवाळसणाच्या काळात त्यांच्या घराला कुलूप होते. त्याची संधी साधून 18 नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास दोन ते तीन चोरटे त्यांच्या घराच्या दिशेने आले. सुरूवातीला त्यांनी कांबळे यांच्या घराच्या खालच्या मजल्यावरील दरवाजाचे कुलूप व कडीकोंडा तोडला. त्यातून आत शिरल्यानंतर वरच्या मजल्यावरील खोलीच्या दरवाजाचे देखील कुलूप व कडीकोंडा तोडला. मात्र, त्याचवेळी कांबळे यांच्या घराशेजारी राहणा-या रहिवाशांना आवाज आल्याने त्यांनी आरोळी ठोकली. रहिवाशी जमा होत असल्याचे पाहून चोरांनी तेथून निसटता पाय घेतला. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कांबळे घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.