औरंगाबाद : दुचाकीवर ट्रिपलसीट जाणार्‍या तिघांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जाधववाडीतील पिता, विवाहित मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर एक नातेवाईकागंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास दौलताबाद घाटातील इको बटालियन कार्यालयाजवळ घडला. यातील जखमीवर घाटीत उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमी व मृतांना तात्काळ घाटीत हलवले.
  मोनिका गणेश रेनवाल (22) व धनेश्वर दामोदर परदेशी (50, दोघेही रा. जाधववाडी) अशी मृतांची नावे आहेत. तर विश्वंभर श्रीकृष्ण मन्हाळ (45, रा. करमाळी, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. फुगे विक्रीचा व्यवसाय करत असलेले धनेश्वर परदेशी यांची मुलगी मोनिका हिचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला आहे. तिला एक वर्षांची चिमुकली आहे. मोनिका, धनेश्वर व त्यांचे नातेवाईक विश्वंभर मन्हाळ असे तिघेही आज सकाळी अकराच्या सुमारास दौलताबाद घाटातील इको बटालियन कार्यलायासमोरुन दुचाकीने (एमएच-20-डीएक्स-7040) औरंगाबादच्या दिशेने येत होते. उतार असल्यामुळे विश्वंभर यांच्या दुचाकीची गती वाढली होती. ट्रिपलसीट असल्याने व समोरुन आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिघेही दुचाकीवरुन खाली कोसळले. वाहनाची धडक बसताच दुचाकी दुरपर्यंत फरफटत गेली. त्यात पाठीमागे बसलेले मोनिका आणि धनेश्वर रस्त्याच्या डाव्या बाजूला तर विश्वंभर हे काही अंतरावर जाऊन पडले. हा अपघात होताच वाहन चालकाने घटनास्थळावरुन धुम ठोकली. यावेळी खुलताबादच्या दिशेने जाणार्‍या आणि येणार्‍या वाहनधारकांनी घटनेची माहिती तात्काळ दौलताबाद पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह उपनिरीक्षक दिलीप बचाटे, जमादार शरद बच्छाव यांनी धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे तिघांना घाटी रूग्णालयात नेले. त्यावेळी मोनिका आणि धनेश्वर यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर विश्वंभर यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे हे करत आहेत.