औरंगाबाद : राज्य सरकारने राज्यातील नागरी स्थानिक संस्थांमधील प्रशासकांच्या मुदवाढीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय गुरूवारी दि.29 जाहीर केला. त्यामुळे औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना प्रशासक म्हणून मुदतवाढ मिळाली आहे. तथापि, सहा महिन्यापूर्वी पांडेय यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करताना त्यात नियुक्तीच्या कालावधीचा उल्लेख राज्य सरकारने केलेला नाही. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत पालिकेवर प्रशासक म्हणून पांडेय कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एप्रिल महिन्यात औरंगाबाद पालिकेची निवडणूक नियोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गामुळे मुंबईसह औरंगाबाद पालिकेची निवडणूक पुढे ढकलली.
त्यामुळे पालिकेवर प्रशासकांची राजवट लागू करण्यात आली. औरंगाबाद पालिकेवर 1 मे पासून शासनाने प्रशासक आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांचीच नियुक्ती केली. प्रशासकांच्या नियुक्तीचे आदेश 29 एप्रिल रोजी जारी करण्यात आले होते. नवीन कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेवर सहा महिन्यांसाठी प्रशासकांची नियुक्ती करता येते. मात्र कोरोना संसंर्गामुळे ओढावलेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी नमूद केलेला नाही. त्यामुळे सहा महिने संपल्यावर प्रशासकाचा कालावधी संपेल, असे गृहित धरता येत नाही. त्यामुळे जोवर पालिकेची निवडणूक होत नाही तोवर प्रशासकांची नियुक्ती कायम असेल. परिणामी, आस्तिककुमार पांडेय पालिका प्रशासकपदी कायम असतील, असे यातून स्पष्ट झाले आहे. पांडेय यांची प्रशासक म्हणून पहिल्या सहा महिन्यांची मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारनेही प्रशासकांच्या मुदतवाढीचा निर्णय देखील जाहीर केला आहे.