औरंगाबाद - शहरातील भाग्यनगर परिसरातील खुल्या जागेत असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या स्व. प्रमोद महाजन सभागृहात मागील 20 वर्षांपासून असलेले अतिक्रमण शुक्रवारी दि.20 अतिक्रमण विभागाने हटविले. त्यांनतर या जागेचा कायदेशीर ताबा हा जिल्हा मराठी पत्रकार संघाला देण्यात आला.

औरंगाबाद पालिकेने भाग्यनगर येथे बांधलेले सभागृह हे जिल्हा मराठी पत्रकार संघ औरंगाबाद नोंदणी क्र.617/2019 यांनी भाडे तत्वावर देण्यासाठी पालिकेकडे रितसर प्रस्ताव दाखल केला होता. त्याअनुषंगाने स्थायी समितीच्या सभेत ठराव क्र.76 दि.9 मार्च रोजी घेण्यात आला. त्यांनतर पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मान्यतेने दि.3 ऑक्टोबर रोजी संघटनेचे अध्यक्ष विनोद शंकर काकडे यांना मालमत्ता विभागाच्या उपायुक्त मालमत्ता अपर्णा थेटे-सेडम यांनी रितसर करारनामा करुन दिला.

या करारनाम्यानुसार जिल्हा मराठी पत्रकार संघाने नियमानुसार ठरलेले भाडे पालिकेकडे जमा केले. सर्व प्रक्रिया पार पडताच सभागृहाच्या जागेत मागील 20 वर्षांपासून असलेले अतिक्रमण शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले. त्यांनतर या जागेचा रितसर ताबा संघटनेचे अध्यक्ष विनोद शंकर काकडे व जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे सर्व सहकारी यांना देण्यात आला. ही कार्यवाही पालिका आयुक्‍त पांडेय यांच्या आदेशान्वये अतिरीक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अपर्णा थेटे, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर.एस. राचतबार, इमारत निरीक्षक जमशीद, पालिका पोलीस कर्मचारी पथक व अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कार्यवाही केली.